LIVE UPDATES

दोडामार्गची आपत्ती व्यवस्थापनाची बैठकच झाली नाही

दिपक गवस यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे कैफियत | तातडीने बैठक घेण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या तहसीलदारांना सूचना
Edited by: कोकणसाद LIVE वृतसेवा
Published on: July 06, 2026 20:18 PM
views 25  views

दोडामार्ग : पावसाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी दोडामार्ग तालुक्यात आयोजित केली जाणारी आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी बैठक यंदा पावसाळा सुरु झाला तरी अद्याप झाली नसल्याने आणि विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संपर्क यादीही प्रसिद्ध करण्यात आली नसल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष दीपक गवस यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी संपर्क कोणाशी साधायचा? असा सवाल उपस्थित करत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी तातडीने बैठक घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी तहसीलदार राहुल गुरव यांना केल्या.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे या सोमवारी दोडामार्ग दौऱ्यावर आले होते. यावेळी तालुक्यात प्रश्नसंदर्भात आंदोलने करण्यात आली होती. जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी बोलावले होते. या बैठकीदरम्यान दीपक गवस यांनी प्रथमतः तालुका आपत्ती व्यवस्थापन बैठक झाली नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. तसेच याबाबत नाराजीही व्यक्त केली.

त्यांनी व पंचायत समितीचे उपसभापती तथा शिंदे शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवत तालुका आपत्ती व्यवस्थापनच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर झाडे पडणे, वाहतूक विस्कळीत होणे किंवा अन्य आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी नेमके कोणाशी संपर्क साधायचा? प्रशासनाने याबाबत स्पष्ट व्यवस्था केलेली नाही, असा सवाल उपस्थित केला. आपत्तीच्या काळात त्वरित प्रतिसाद मिळावा यासाठी संपर्क यंत्रणा सक्षम आणि अद्ययावत असणे आवश्यक असल्याचे श्री गवस यांनी सांगितले. यावेळी गणेशप्रसाद गवस यांनीही महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. एमएसआयडीसीच्या रस्त्यालगत असलेली अनेक झाडे धोकादायक अवस्थेत असून ती तातडीने हटविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित विभागाने विलंब न करता कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी तहसीलदार राहुल गुरव यांना सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक त्या सूचना तातडीने देण्याचे निर्देश दिले. तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत मिळण्यासाठी संपर्क व्यवस्था प्रभावी करण्यावर भर देण्यास सांगितले. दरम्यान, पोलीस आणि प्रशासनाने दोडामार्ग तालुक्याला अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे. आपत्ती व्यवस्थापनासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयातही आवश्यक ती पूर्वतयारी दिसून येत नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित बाबींमध्ये प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज आहे, असा आरोप दीपक गवस यांनी केला. दोडामार्ग तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर प्रशासनाकडून कितपत प्रभावी अंमलबजावणी केली जाते? याकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.