LIVE UPDATES

देवगड किनारपट्टीवर युद्धपातळीवरील शोधमोहीम

ड्रोन कॅमेरे, प्रशासन आणि मच्छीमारांचे संयुक्त प्रयत्न | बेपत्ता तरुणाचा शोध अद्याप सुरूच
Edited by: स्वप्नील लोके
Published on: May 25, 2026 17:15 PM
views 50  views

देवगड : मिठमुंबरी-बागवाडी समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या पाच मित्रांपैकी चार तरुण समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते तिघांना वाचविण्यात यश आले मात्र एका तरुणाचा समुद्रात बुडून बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी घडली असून संपूर्ण प्रशासनाने युद्धपातळीवर शोधमोहीम हाती घेतली आहे. स्थानिक मच्छीमार, ग्रामस्थ आणि विविध शासकीय विभागांच्या मदतीने सुरू असलेली ही मोहीम सोमवारी दिवसभर सुरू ठेवण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच प्रशासन तातडीने सक्रिय झाले असून मत्स्य विभागाच्या ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने समुद्रकिनाऱ्यावर विस्तृत शोधकार्य राबविण्यात आले. देवगड किल्ल्यापासून तब्बल २५ किलोमीटर परिसरात फणसे, पडवणे, गिर्ये, मिठबाव, तांबळडेग आदी किनारी भागांमध्ये ड्रोनच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. समुद्रातील प्रवाह, भरती-ओहोटी तसेच किनारपट्टीचा भूभाग लक्षात घेऊन शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

या संपूर्ण मोहिमेत तहसीलदार रमेश पवार हे स्वतः सकाळपासून घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण कारवाईवर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधत शोधकार्य सुरू आहे. यावेळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सभापती गणेश राणे, पोलिस उपनिरीक्षक संतोष भालेराव तसेच विविध विभागांचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.

दरम्यान, संबंधित तरुणांच्या पालकांनी मुंबईहून देवगडमध्ये धाव घेतली असून ते देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत प्रशासनाकडून ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र बेपत्ता युवकाचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.

दरम्यान, सायंकाळी चार वाजल्यानंतर पुन्हा एकदा ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण देवगड तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून किनारी पर्यटन करताना सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.