LIVE UPDATES

दोडामार्ग तालुका न्यायालयातील कर्मचारी बेमुदत संपावर

सुधारित वेतनश्रेणीसह प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन, मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 17, 2026 06:56 PM
views 59  views

दोडामार्ग : महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी संघटनेच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी मंगळवार, १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात दोडामार्ग तालुका न्यायालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी होत न्यायालयाच्या आवारात आंदोलन सुरू केले आहे. सुधारित वेतनश्रेणी लागू होईपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्धार कर्मचारी संघटनेने व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी संघटनेने वेतन आणि सेवाविषयक विविध मागण्यांसंदर्भात शासनाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र, गेल्या २० ते २१ महिन्यांपासून हे प्रस्ताव शासनदरबारी प्रलंबित आहेत. वारंवार निवेदने देऊन तसेच विविध मार्गांनी शासनाचे लक्ष वेधूनही मागण्यांबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. यापूर्वी कर्मचाऱ्यांनी दोन वेळा काळ्या फिती लावून काम करत निषेध नोंदविला होता. मात्र, त्यानंतरही शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर संघटनेने १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला.

समान काम, समान वेतनाची प्रमुख मागणी

न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये समान काम, समान वेतन या तत्त्वानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करणे, विविध वेतन आयोगांच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे तसेच वेतन व सेवाविषयक प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे या मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांसाठी संघटनेकडून गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र, शासनाकडून निर्णय होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

दोडामार्ग तालुका न्यायालयातील गट-क, स्टेनोग्राफर, बेलीफ तसेच गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांनी एकजुटीने संपात सहभागी होत आपल्या मागण्यांसाठी आवाज उठविला आहे. शासनाने प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

मागण्यांची पूर्तता होईपर्यंत हा बेमुदत संप सुरूच ठेवण्याचा ठाम निर्धार कर्मचारी संघटनेने व्यक्त केला आहे. या आंदोलनात दोडामार्ग तालुका न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक एम. डी. धुरी, वरिष्ठ लिपिक आर. जी. कानसे, व्ही. व्ही. नाईक, कनिष्ठ लिपिक एस. एस. मालवणकर, के. एस. सावंत, एस. पी. देसाई, आर. ए. मालशे, बेलीफ आर. एन. परब, एस. एम. कदम, शिपाई आर. ए. शिरसाट, जी. डी. पास्ते, पी. आर. गवस आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत.