LIVE UPDATES

vengurla news : वेंगुर्लेत प्रथमच रंगणार ‘जिल्हास्तरीय विज्ञान नाट्योत्सव २०२६

३ ऑक्टोबर रोजी रंगमंचावर अवतरणार विज्ञानाची विविध रूपे ; शिक्षण विभाग जिल्हा परिषद आणि सिंधुदुर्ग विज्ञान मंडळाचे आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 02, 2026 13:34 PM
views 65  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

वेंगुर्ला : शिक्षण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार), राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (महाराष्ट्र, पुणे), नेहरू विज्ञान केंद्र (वरळी, मुंबई), राज्य विज्ञान शिक्षण संस्था (प्रादेशिक विद्या प्राधिकरण, रविनगर, नागपूर) आणि विभागीय शिक्षण उपसंचालक (कोल्हापूर विभाग) यांच्या सहकार्याने ‘जिल्हास्तरीय विज्ञान नाट्योत्सव २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. असा कार्यक्रम वेंगुर्ले तालुक्यात प्रथमच आयोजित केला जात आहे.  

 ​हा नाट्योत्सव शनिवार, दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह, वेंगुर्ला कॅम्प येथे पार पडणार असून पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्ह्यातील, तालुक्यातील इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उदघाटन होणार आहे.  ​​यात विद्यार्थी आणि बालकलाकार विज्ञानावर आधारित विविध सामाजिक विषयांवर आपली नाट्ये सादर करणार आहेत.

या नाट्योत्सवासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) : मित्र, साधन की धोका?, इलेक्ट्रिक वाहने : पुढचा मार्ग, आंतरतारकीय अधिवास / अंतराळातील मानवी वस्ती, महासागराचे पुनरुज्जीवन – पिढ्यांचे जतन हे विषय देण्यात आले आहेत. शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी ​सकाळी ८:०० वाजता नाव नोंदणी, ९:३० वाजता उद्घाटन समारंभ, १०:०० वाजता प्रत्यक्ष नाट्य सादरीकरणास प्रारंभ, ​दुपारी १:३० वाजता भोजन अवकाश, २:०० वाजता नाट्य सादरीकरण, ​सायंकाळी ५:०० वाजता: बक्षीस वितरण सोहळा  ​विज्ञान आणि कलेचा अनोखा संगम असलेला हा जिल्हास्तरीय विज्ञान नाट्योत्सव पाहण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विज्ञानप्रेमी, शिक्षक, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी केले आहे.