
सावंतवाडी : तालुक्यातील ओवळीये वरचीवाडी येथे बंद घराच्या छतावरील कौले काढून आत प्रवेश करत अज्ञात चोरट्याने कपाटातील तब्बल २ लाख ५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लांबवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी, ८ सप्टेंबर रोजी घडली.
या प्रकरणी कौस्तुभ विष्णू सावंत (वय ३३, रा. ओवळीये वरचीवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार कौस्तुभ सावंत यांचे घर बंद असताना अज्ञात चोराने घराच्या छताची कौले काढून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातच उपलब्ध असलेल्या चावीचा वापर करून कपाट उघडले आणि कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले.
यात १ लाख ६५ हजार रुपये किमतीचे ४१.५८० ग्रॅम वजनाचे हॉलमार्क असलेले सोन्याचे मंगळसूत्र, २५ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि १५ हजार रुपये किमतीची ३ ग्रॅम वजनाची सोन्याची बाली अशा एकूण २ लाख ५ हजार रुपये किमतीच्या जुन्या वापरत्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे.
घरात चोरी झाल्याचे निदर्शनास येताच कौस्तुभ सावंत यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी शेलार, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील तसेच पोलीस हवालदार गलोले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच तपासाला गती देण्यासाठी फॉरेन्सिक व्हॅनलाही पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील करत आहेत.










