LIVE UPDATES

Devgad Study Center : स्वप्न अधिकारी होण्याचे ,हक्काची अभ्यासिका उभारण्याचे

अभ्यासिकेत काय हवंय? देवगड नगरपंचायतीचा थेट विद्यार्थ्यांनाच सवाल
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 25, 2026 01:50 PM
views 9  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

देवगड : एमपीएससी, यूपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या देवगडमधील विद्यार्थ्यांसाठी आता सुसज्ज अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध होणार आहे.

देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ६ मध्ये सर्व सोयीसुविधांनी युक्त अभ्यासिका उभारण्यात येत असून, सध्या या कामाला युद्धपातळीवर वेग आला आहे. पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून हा उपक्रम साकारला जात आहे.

या अभ्यासिकेत एमपीएससी, यूपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. मात्र, अभ्यासिका उभारताना केवळ इमारत किंवा बसण्याची व्यवस्था न करता विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष गरजा आणि अपेक्षांनुसार सुविधांचा समावेश व्हावा, या उद्देशाने नगरपंचायतीने विद्यार्थ्यांकडूनच सूचना व प्रस्ताव मागविले आहेत.

अभ्यासिकेमध्ये कोणत्या प्रकारची पुस्तके असावीत, कोणते संदर्भ साहित्य उपलब्ध करून द्यावे, अभ्यासासाठी आवश्यक फर्निचर, इंटरनेट, संगणक तसेच इतर कोणत्या सुविधा असाव्यात, याबाबत विद्यार्थ्यांनी आपली मते मांडावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या सूचना देवगड-जामसंडे नगरपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष सादर कराव्यात किंवा खालील 

 व्हॉट्सॲप क्रमांकवर 

८७६७२ ३०७८०,८७६७७ २२६०२ सूचना पाठवावी.

याबाबत प्रभागाच्या नगरसेविका तथा पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर आणि देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हरिदत्त माने यांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे.

विद्यार्थ्यांच्या सूचनांचा विचार करून अभ्यासिका अधिक उपयुक्त, सुसज्ज आणि सर्वसमावेशक बनविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे देवगड परिसरातील एमपीएससी, यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या सूचना द्याव्यात. विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि गरजांनुसार उभारली जाणारी ही अभ्यासिका त्यांच्या प्रशासकीय सेवेतील स्वप्नपूर्तीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.