LIVE UPDATES

चतुर्थीपूर्वी शेवरे , ओंबळमध्ये बीएसएनएलचे फोरजी टॉवर कार्यान्वित

पालकमंत्र्यांचे पंचक्रोशीतील नागरिकांकडून आभार
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 08, 2026 13:03 PM
views 57  views
#kokansadlive#news update#konkan update#BSNL4G

देवगड : देवगड तालुक्यातील  शेवरे आणि ओंबळ येथील BSNL 4G टॉवरचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी अखेर पूर्ण झाली असून,ही सेवा कार्यान्वित झाली आहे. गणेश चतुर्थीपूर्वी दोन्ही टॉवर सुरू करण्याचे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले होते. त्यानुसार टॉवर सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, पालकमंत्र्यांचे पंचक्रोशीतील नागरिकांकडून आभार मानण्यात येत आहेत.

शेवरे आणि ओंबळ या ग्रामीण भागात BSNLचे टॉवर सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. टॉवर उभारणीचे काम सुमारे सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झाले होते. मात्र, प्रत्यक्ष सेवा सुरू झालेली नसल्याने नागरिकांना मोबाईल नेटवर्कच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. टॉवर कार्यान्वित करण्यासाठी ओंबळचे सरपंच अरुण पवार, शिरगाव परिसरातील पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिकांकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.

याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी वारंवार संपर्क साधून टॉवर सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. गणेश चतुर्थीपूर्वी कोणत्याही परिस्थितीत दोन्ही टॉवर कार्यान्वित केले जातील, असा शब्द पालकमंत्र्यांनी दिला होता. त्यानुसार दोन्ही टॉवर कार्यान्वित झाले आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे तसेच अन्य शहरांमधून मोठ्या संख्येने चाकरमानी गावाकडे दाखल होत आहेत. अशा परिस्थितीत BSNLची 4G सेवा सुरू झाल्याने मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेटची सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. दैनंदिन संपर्कासह विविध ऑनलाइन कामांसाठीही नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे.या कामासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह अमित साटम, राजू शेठ्ये, संतोष फाटक आणि बंड्या नारकर यांनीही प्रयत्न केल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी सांगितले.

या दोन्ही टॉवरचा लाभ केवळ शेवरे आणि ओंबळ या दोन गावांपुरता मर्यादित न राहता नाद, शेवरे, ओंबळ, महाळुंगे तसेच आसपासच्या भागातील नागरिकांना होणार आहे. ग्रामीण भागातील दीर्घकाळ प्रलंबित असलेली मोबाईल नेटवर्कची समस्या दूर होण्यास मदत होणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.