
देवगड : पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार शनिवारी तिर्लोट-मोहुळ गावातील ठाकूरवाडी, केरपोई परिसरात भातपिकाच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्यात आली. पावसाअभावी तसेच प्रतिकूल हवामानामुळे भातपिकाचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली.
यावेळी पंचायत समिती सदस्य रविंद्र तिर्लोटकर यांनी शेतकऱ्यांच्या शेतांवर प्रत्यक्ष भेट देत भातपिकाची पाहणी केली. नुकसानीची स्थिती, पिकाची अवस्था तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी याबाबत त्यांनी माहिती घेतली. पाहणीदरम्यान कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही पिकाच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती घेण्यात आली.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर संबंधित यंत्रणेने तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी सुरू केल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. भातपिकाच्या नुकसानीची योग्य प्रकारे नोंद घेऊन पुढील कार्यवाहीसाठी अहवाल तयार करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाकडून पाहणी करण्यात आली. यावेळी तिर्लोट सरपंच रितीका जुवाटकर, उपसरपंच कल्पेश घाडी, मंडळ कृषी अधिकारी संभाजी जाधव, कृषी सहाय्यक दिनेश लवटे, पोलीस पाटील अमित घाडी यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.










