
देवगड : कुणकेश्वर येथील मंदिराच्या पाठीमागील धोकादायक वळणावरील तुटलेल्या संरक्षक कठड्याबाबत 'कोकणसाद LIVE' ने सातत्याने आवाज उठवल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने नव्याने मजबूत संरक्षक कठडा उभारण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, एका बाजूला सुरक्षेची कामे सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला समुद्रालगतच्या संरक्षक बंधाऱ्यावरील संरक्षक पडदा कोसळल्याने नवीन सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कुणकेश्वर मंदिराच्या समुद्रालगत उभारण्यात आलेल्या संरक्षक बंधाऱ्यावरून यात्राकाळात देवस्वारी तीर्थस्थानी नेली जाते. तसेच पर्यटकही याच मार्गावरील पायऱ्यांद्वारे समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी सिमेंटकाँक्रीटच्या पायऱ्यां बसविण्यात आल्या होत्या. यावरील संरक्षक कठड्याची पडदीमधील शिगा समुद्राच्या अजस्त्र लाटांच्या सततच्या माऱ्यामुळे आतून गंजून कमकुवत झाल्या होत्या.. रविवारी सायंकाळी झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे ही संरक्षक कठड्याची पडदी कोसळली. या घटनेमुळे या बंधाऱ्यावरील उर्वरित संरक्षक कठडेही जीर्ण अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. आतील लोखंडी शिगा गंजल्याने संपूर्ण बांधकाम कमकुवत झाले असून, उर्वरित भागही कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यात्रेकरू, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रश्न गंभीर बनला आहे.
धोकादायक वळणावरील संरक्षक कठड्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले, तरी समुद्रालगतच्या संरक्षक बंधाऱ्यावरील जीर्ण झालेली संरक्षक भिंतीच्या बाजूने उभारलेली सिमेंट काँक्रीटची पडदी तातडीने बदलून संपूर्ण तटबंदीची संरचनात्मक तपासणी करावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि भाविकांकडून होत आहे.










