LIVE UPDATES

अदानी - अंबानींना पोसण्यासाठी कोकणातील माणसाचा बळी देऊ देणार नाही : राजू शेट्टी

अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात देवगडमध्ये सर्वपक्षीय एल्गार
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 03, 2026 19:35 PM
views 79  views

देवगड : "कोकणातील शेतकरी पहिल्यांदाच आपल्या अस्तित्वासाठी सरकारकडे काहीतरी मागत होता; मात्र त्याचा आवाज सरकारपर्यंत पोहोचलाच नाही. आंबा बागायतदारांना अवघी २२० रुपयांची नुकसानभरपाई देऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करण्यात आले आणि त्याचे श्रेयही घेतले जात आहे. एका बाजूला कोकणचा 'कॅलिफोर्निया' करण्याच्या घोषणा आणि दुसऱ्या बाजूला पर्यावरण उद्ध्वस्त करणारे प्रकल्प आणून कोकणचे वाळवंट करण्याची तयारी सुरू आहे. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा प्रकल्पाला आमचा विरोध नाही; पण अणुऊर्जा प्रकल्पाला आमचा ठाम विरोध आहे. अदानी-अंबानी यांना पोसण्यासाठी कोकणातील माणसाचा बळी देण्याचा प्रयत्न आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही," असा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला. देवगड येथे आयोजित अणुऊर्जा प्रकल्पविरोधी जाहीर सभेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी महादेव जानकर, माजी खासदार विनायक राऊत, मंगेश सावंत, शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख, विलास साळसकर, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, उबाठा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव नाईक, सुशांत नाईक, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, मकरंद शिंदे, आंबा बागायतदार संघटनेचे आप्पा अनुभवणे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महादेव जानकर यांनी, "कोकणात अणुऊर्जा प्रकल्प होऊ नये म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. आज सर्व काही अदानी-अंबानींच्या ताब्यात जात आहे. जनतेच्या हितापेक्षा उद्योगपतींचे हित जपणाऱ्या सरकारविरोधात लोकांनी एकत्र उभे राहिले पाहिजे," असे सांगत राज्य सरकारवर टीका केली. माजी खासदार विनायक राऊत यांनी, "अणुऊर्जा प्रकल्प मानवजातीसाठी धोकादायक आहे. राणे यांच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. कोकणच्या अस्तित्वासाठी हा लढा शेवटपर्यंत सुरू राहील," असा इशारा देत प्रकल्प रद्द व्हावा यासाठी मालवणी भाषेत कोकणातील देवस्थानकडे साकडे घातले.तर शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी आंबा बागायतदारांना मिळालेल्या तुटपुंज्या मदतीवर टीका करत, "जिल्हा परिषदेतही अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात ठराव मंजूर झाला पाहिजे," अशी मागणी केली.

यावेळी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी , युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर, हिंदळेचे सरपंच मकरंद शिंदे, काका ढोके, गणेश गावकर, किरण टेंबुलकर आणि दिनेश धुवाळी यांनीही मनोगत व्यक्त करत अणुऊर्जा प्रकल्पाला ठाम विरोध नोंदविला. कोकणातील पर्यावरण, शेती आणि नागरिकांच्या अस्तित्वासाठी हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

राजू शेट्टी यांचे भाषण संपल्यावर  राजू शेट्टी, महादेव जानकर व इतर नेते आंदोलनस्थळी जात असताना पोलिसांनी त्यांना अडवून पुढे जाण्यास मज्जाव केला. मात्र पोलिसांची नजर चुकवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गणेश गावकर, गणेश वाळके, शरद वाळके, अजय नाणेरकर आणि संजय आचरेकर हे पदाधिकारी मिठमुंबरी-बागवाडी येथील खाडीत जलसमाधी आंदोलनासाठी उतरले. "जिल्हाधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवा," अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. जिल्हाधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र, "न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील," असा निर्धार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. दरम्यान, पाण्यात उतरलेल्या आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

आंबा-काजू बागायतदारांच्या जलसमाधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, उपविभागीय पोलिस अधिकारी नयोमी साटम, प्रांताधिकारी जगदीश कातकर , तहसीलदार,गटविकास अधिकारी निलेश जगताप, तहसीलदारमहसूल, ग्रामपंचायत, आपत्ती व्यवस्थापनासह सर्व प्रशासकीय यंत्रणा आंदोलनस्थळी सज्ज होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद दुखंडे यांनी केले.