LIVE UPDATES

मुणगेवासीयांनी अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात पुकारलं रणशिंग

जीवनमानावर गंभीर परिणामांची नागरिकांना भीती | ग्रामसभेत तीव्र आंदोलनाचा इशारा
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 19, 2026 17:19 PM
views 73  views

देवगड : देवगड तालुक्यातील मुणगे येथील ग्रामस्थांनी प्रस्तावित औष्णिक ऊर्जा व अणुऊर्जा प्रकल्पांना तीव्र विरोध दर्शविला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी सौरऊर्जा व पवनऊर्जा प्रकल्पांना पाठिंबा देत औष्णिक व अणुऊर्जा प्रकल्पांना विरोध करण्याचा एकमताने ठराव मंजूर केला. मुणगे गावात प्रस्तावित ४००० ते ७२०० मेगावॉट क्षमतेच्या एनटीपीसी अणुऊर्जा प्रकल्पासाठी सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असल्याचे सांगितले जात आहे. हा प्रकल्प उभारल्यास सिंधुदुर्ग जिल्हा ऊर्जा केंद्र म्हणून विकसित होईल, मात्र स्थानिक पर्यावरण, शेती, मत्स्यव्यवसाय आणि नागरिकांच्या जीवनमानावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.

भगवती मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या मुणगेवासीय व मुंबईस्थित ग्रामस्थांच्या संयुक्त सभेत शासनाच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. स्थानिकांना विश्वासात न घेता हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तसेच प्रकल्पाविरोधातील आंदोलनात कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावात प्रवेश देण्यात येणार नसल्याचा निर्णयही सभेत घेण्यात आला.

प्रकल्पाविरोधातील लढा अधिक व्यापक करण्यासाठी देवगड तालुक्यातील विविध गावांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. शासनाने हा प्रकल्प तातडीने रद्द करावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

पर्यावरणाला धोका असल्याचा दावा

मुणगेवासीयांच्या मते, कोकणात अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचा प्रस्ताव असून देवगड परिसरात अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. परिसरात मोजमाप व सीमांकनाच्या खुणा आढळल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. हा प्रकल्प केवळ मुणगे गावापुरता मर्यादित नसून संपूर्ण देवगड तालुका आणि आसपासच्या परिसराच्या पर्यावरणासाठी घातक ठरू शकतो. पर्यावरणाचा ऱ्हास, नैसर्गिक संसाधनांवर होणारा परिणाम आणि संभाव्य विस्थापनाच्या भीतीमुळे ग्रामस्थांनी प्रकल्पाला तीव्र विरोध कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.