LIVE UPDATES

देवगड जामसंडे नगरपंचायतीची प्लास्टिक बंदीविरोधात धडक मोहीम

"स्वच्छ सर्वेक्षण २०२५” व “माझी वसुंधरा अभियान ७.०" अंतर्गत जनजागृतीसह प्लास्टिक जप्ती कारवाई
Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 22, 2026 18:28 PM
views 102  views

देवगड : देवगड जामसंडे नगरपंचायत मार्फत आज दिनांक २२ मे २०२६ रोजी शुक्रवार बाजाराच्या दिवशी "स्वच्छ सर्वेक्षण २०२५" तसेच "माझी वसुंधरा अभियान ७.०" अंतर्गत शहरामध्ये विशेष प्लास्टिक बंदी जनजागृती व तपासणी मोहीम राबविण्यात आली. पर्यावरणासाठी अत्यंत घातक ठरणाऱ्या सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर शासनाने बंदी घातली असून, विशेषतः १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरास मनाई करण्यात आली आहे. या अनुषंगाने शासन व वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त आदेशानुसार नगरपंचायतीने शहरामध्ये धडक जप्ती मोहीम करण्यात आले आहे.

यावेळी मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायत देवगड जामसंडे मार्फत विशेष तपासणी पथक नियुक्त करण्यात आले होते. या पथकाने शुक्रवार बाजार परिसर, देवगड सडा भाग १ व भाग २ तसेच विविध व्यापारी आस्थापनांना भेट देऊन व्यापाऱ्यांना प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत सूचना दिल्या. विशेषतः १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या, डिस्पोजेबल साहित्य व बंदी असलेले प्लास्टिक साहित्य जप्त करून संबंधितांना समज देण्यात आली.या मोहिमेदरम्यान व्यापारी व नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. प्लास्टिकमुळे माती, पाणी, समुद्र आणि सागरी जीवसृष्टीवर होणारे गंभीर दुष्परिणाम तसेच मानवी आरोग्यावर होणारे परिणाम याबाबत जनजागृती करण्यात आली. "प्लास्टिकमुक्त देवगड" ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी कापडी व कागदी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन नगरपंचायतीमार्फत करण्यात आले.

शहर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी महत्त्वाची असून, स्वच्छ सर्वेक्षण २०२५ मध्ये देवगड जामसंडे शहराचा दर्जा उंचावण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. तसेच भविष्यातही अशा प्रकारच्या तपासणी मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापारी व आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.या कारवाई मोहिमेत देवगड जामसंडे नगरपंचायतीचे कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण लोंढे, अर्चना गायकवाड, स्वप्नील बुचडे, लिपिक चारुदत्त पारकर, कुंदन घाडी, निलेश बांदिवडेकर, गुरुप्रसाद अदम, राजदीप कदम, मुकादम मंगेश कदम, शहर समन्वयक राजेंद्र दळवी तसेच सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरपंचायतीच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले असून पर्यावरण संवर्धनासाठी अशा मोहिमा अधिक प्रभावीपणे राबविण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.