
वैभववाडी : आर्चिणे मधलीवाडी येथील सुमित गोपाळ दर्डे (वय २५) या तरुणाने विषारी द्रव्य प्राशन केल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सुमित दर्डे हा आपल्या वडिलांसह आर्चिणे मधलीवाडी येथे राहत होता. त्याचा भाऊ व वहिनी काही कामानिमित्त २९ एप्रिलपासून मुंबई येथे गेले होते. त्यामुळे घरात सुमित आणि त्याचे वडील असे दोघेच होते.सुमित हा काल त्याच्या आत्येबहीणीच्या साखरपुडा कार्यक्रमाला गेला होता. रात्री उशिरा तो घरी परतला. घरी आल्यानंतर तो हॉलमध्ये झोपला होता, तर वडील दुसऱ्या खोलीत होते. दरम्यान, रात्री त्याने आपल्या एका मित्राला सकाळी लवकर कामासाठी घरी येण्याचा मोबाईलवर संदेश पाठविला होता.आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्याचा तो मित्र घरी आल्यानंतर त्याने दरवाजा ठोठावला. मात्र प्रतिसाद न मिळाला नाही.मात्र दार ठोठवल्याचा आवाज ऐकून सुमितचे वडील जागे झाले. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता सुमित हा घरातील लोखंडी बाराला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारी धावून आले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
घटनास्थळी विषारी द्रव्याची बाटली आढळून आल्याने त्याने विष प्राशन करून त्यानंतर गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. एस. बाईत करीत आहेत.










