LIVE UPDATES

मुंबई - गोवा महामार्गावरच्या गॅरेजमध्ये कार घुसली

गाड्यांचं मोठे नुकसान |
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: May 24, 2026 12:51 PM
views 643  views

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप-जांभळी येथे आज रात्री साडेनऊच्या सुमारास एका नवीन 'महिंद्रा ईव्ही' (Mahindra EV) इलेक्ट्रिक कारचा वेग अचानक अनियंत्रितपणे वाढल्याने भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील ही कार थेट रस्त्यालगतच्या एका गॅरेजमध्ये घुसली. या थरारक अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, निरवडे येथील वेदांत मल्हार (वय ३०) यांनी अवघ्या महिनाभरापूर्वीच ही नवीन 'महिंद्रा ईव्ही' कार खरेदी केली होती. विशेष म्हणजे आजच या गाडीला अधिकृत नंबर मिळाला होता. आज रात्री वेदांत हे ओरोस येथून आपल्या घरी परतत असताना, झाराप येथे आले असता अचानक त्यांच्या गाडीचा स्पीड प्रचंड वाढला. गाडीचा वेग थेट १०७ किमी प्रतितास एवढा झाल्याने वेदांत यांचा वाहनावरील ताबा सुटला. नियंत्रण सुटलेली ही कार महामार्गालगत असलेल्या एका गॅरेजमध्ये थेट घुसली. हा अपघात एवढा भीषण होता की, ब्रेकचा आणि धडकेचा मोठा आवाज महामार्गालगतच्या घरांपर्यंत पोहोचला. आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या अपघातात महिंद्रा कारच्या दर्शनी भागाचा पार चक्काचूर झाला आहे. तसेच गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या अनेक वाहनांना मागून जोरदार धडक बसल्याने काही गाड्या अक्षरशः रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि त्यांचेही मोठे नुकसान झाले.

"गाडीचा वेग अचानक कसा वाढला?" याबद्दल घटनास्थळी नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती. ही तांत्रिक बिघाडाची समस्या असल्याचा संशय व्यक्त होत असून, या घटनेमुळे आता इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कुडाळ पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत.