
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील युवकांच्या रोजगाराचे आणि औद्योगिक विकासाचे स्वप्न म्हणून उभारण्यात आलेली आडाळी एमआयडीसी आज अवैध खनिजयुक्त माती उत्खननाच्या चर्चेमुळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. उद्योगधंद्यांची चाके फिरण्याऐवजी रात्रीच्या अंधारात जेसीबी, डंपर आणि अवजड वाहनांची संशयास्पद वर्दळ सामान्य नागरिकांनाही दिसते; मग महसूल प्रशासन, खनिकर्म विभाग आणि संबंधित यंत्रणांना हा प्रकार दिसत नाही का? की सगळेच आर्थिक व्यवहारांच्या धुरात आंधळे झाले आहेत? असा आरोप करत ठाकरे शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, महाराष्ट्र शासनाला आडाळी एमआयडीसीमध्ये उद्योगधंदे आणता येत नसतील, तर शासनाने सरळ या परिसराला चोरट्या खनिज उत्खननाचा ‘खनिज पट्टा’ म्हणून जाहीर करावे, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला आहे. उद्योगांच्या नावाखाली गेली तेरा वर्षे युवकांना केवळ आश्वासनांची खैरात वाटली जात असून, प्रत्यक्षात रोजगारनिर्मितीचा मागमूसही नसल्याचा आरोप त्यांनी केला.
आडाळी एमआयडीसी ही दोडामार्ग तालुक्यासह जिल्ह्यातील युवकांच्या भविष्याची आशा होती. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोव्याच्या सीमेलगत असलेले भौगोलिक स्थान आणि वाहतुकीसाठी पोषक वातावरण यामुळे येथे मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे उभे राहतील, अशी अपेक्षा होती. मात्र, उद्योग आणण्यात शासन पूर्णपणे अपयशी ठरले असून आज एमआयडीसी परिसर अवैध माती उत्खननाच्या अड्ड्यात रूपांतरित झाल्याचे चित्र दिसत असल्याचा घणाघात श्री. गवस यांनी केला. रात्रभर जेसीबी, डंपर आणि अवजड वाहनांची सुरू असलेली वर्दळ सर्वसामान्यांना दिसते, मात्र महसूल प्रशासन, खनिकर्म विभाग आणि संबंधित यंत्रणांना याकडे जाणूनबुजून कानाडोळा करत आहेत. कारण खनिज तस्करांनी त्यांच्या डोळ्यावर आर्थिक चष्मा लावला आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला.
या प्रकारामागे प्रशासनातील काही घटकांचा छुपा आशीर्वाद असल्याची चर्चा आता उघडपणे सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले. एमआयडीसीमध्ये उद्योगधंदे उभे राहण्याऐवजी केवळ पायाभूत सुविधांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. गेली पाच वर्षे फक्त रस्ते, वीज आणि गटारे याच कामांचा गाजावाजा केला जात आहे. मात्र प्रत्यक्ष उद्योग येण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे येथे उद्योग येण्यास अजून किती वर्षे लागतील, याचीही कोणतीच शाश्वती नाही, असे गवस यांनी स्पष्ट केले.
दोडामार्ग तालुक्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत असून युवकांच्या तोंडाला अक्षरशः पाने पुसली जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. येथे उद्योग आले असते तर स्थानिकांना थोडाफार रोजगार मिळाला असता. मात्र शासनाच्या दुर्लक्षामुळे आता एमआयडीसीच्या जमिनीतील खनिजयुक्त मातीवर काही मोजक्या लोकांनी डोळा ठेवला आहे. प्रशासन धीम्या गतीने काम करत आहे की सगळे ‘सेटलमेंट’मध्ये गुंतले आहेत, हेच समजत नाही, असा टोला त्यांनी लगावला. शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवूनही कारवाई होत नसल्याने संशय अधिक गडद होत असल्याचे सांगत, स्थानिक आमदारांना काही देणंघेणं नाही. उद्योगमंत्री फक्त आश्वासने देतात. पालकमंत्री आणि इतर मंत्र्यांना दोडामार्गचे कोणतेही सोयरसुतक उरलेले नसल्याचा आरोप श्री. गवस यांनी केला.
जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याच्या घोषणा हवेत विरल्या का? असा सवाल उपस्थित करत तालुक्यातील जनतेने आणि युवकांनी आता हे ओळखले पाहिजे की निवडणुकीपुरतेच त्यांचा वापर केला जातो. मात्र ठाकरे शिवसेना युवकांच्या रोजगारासाठी आणि आडाळी एमआयडीसीमध्ये उद्योगधंदे यावेत यासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभे करेल, असा स्पष्ट इशारा संजय गवस यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.










