LIVE UPDATES

मिठमुंबरी बागवाडी समुद्रात युवा पर्यटक बुडाला

तिघांना वाचविण्यात स्थानिकांना यश | बुडलेला पर्यटक बेपत्ता, शोधमोहिम सुरू | सुट्टीसाठी आले होते मित्राकडे
Edited by: स्वप्नील लोके
Published on: May 24, 2026 20:45 PM
views 83  views

देवगड : मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेल्या पाच युवकांपैकी एक बुडाला असून तिघांना वाचविण्यात स्थानिक मच्छिमारांना यश आले आहे. यातील चैतन्य राजेंद्र गुरव(२२) मुळ रा.दादर नायगाव असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे तर  सोहम जयेश मंडोद(२०) मुळ रा.दादर नायगाव याची प्रकृती चिंताजनक असून त्याला जामसंडे येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी  दाखल करण्यात आले.ही घटना रविवारी सायंकाळी ५.४५ वा.सुमारास घडली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनूसार, मुळ देवगड ब्राम्हणदेववाडी येथे राहणारा यश राजेंद्र उपरकर(२१) हा दादर नायगाव येथे वास्तवास आहे.तेथिल त्याचे मित्र ओम दिपक चव्हाण(१७), चैतन्य राजेंद्र गुरव, सोहम जयेश मंडोद आणि अर्णव राजेश तारी(२०) यांच्यासमवेत तो सुट्टीनिमित्त देवगड येथे गावी आला होता.रविवारी सायंकाळच्या सुमारास हे पाचही जण मिठमुंबरी बागवाडी येथील समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेले होते.यश उपरकर हा किनाऱ्यावर राहीला.तर उर्वरीत चौघेजण पोहण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरले.पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने हे चारही जण बुडू लागले.त्यांनी वाचविण्यासाठी याचना केली यावेळी तेथिल स्थानिक रमेश मनोहर तारी, लक्ष्मण मनोहर तारी ,मनिष रमेश तारी, बाबुराव धुरी आणि बाळा राजम यांनी तात्काळ घटनास्थळी जात बुडणाèया वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

यातील बाबूराव धुरी व बाळा राजम यांनी नौकेच्या सहाय्याने बुडणाऱ्या युवकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला.या मदतकरत्यांनी ओम चव्हाण, सोहम मंडोद, अर्णव तारी यांना वाचवून किनाऱ्यावर आणले.यातील सोहम मंडोद हा बेशुध्द अवस्थेत असल्याने त्याला कृत्रिम श्वासोच्छवास देत त्याला शुध्दीवर आणण्यात आले.परंतू यादरम्यान चैतन्य गुरव हा पाण्यात दिसेनासा झाला.यावेळी स्थानिक मच्छिमारांना नौकांच्या सहाय्याने पाण्यात त्याचा शोध घेतला परंतू सायंकाळी उशिरापर्यंत तो सापडला नाही.दरम्यान प्रकृती  चिंताजनक असलेल्या सोहम मंडोद याला तात्काळ खाजगी वाहनाने देवगड ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.अधिक उपचारासाठी  त्याला जामसंडे येथील खाजगी रूग्णालयात नेण्यात आले.घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष भालेराव, स.पो.उपनिरिक्षक प्रवीण सावंत, पो.कॉ.प्रसाद आचरेकर यांनी घटनास्थळी भेट देवून घटनेची माहिती जाणून घेतली.घटनेची माहिती परिसरात पसरताच स्थानिकांनीही घटनास्थळी गर्दी केली होती.

पोहण्याचा हट्ट जीवाशी आला

या घटनेतील युवक यश उपरकर यांनी सांगीतले, सुट्टी एन्जॉय करण्यासाठी माझे मुंबईतील मित्र गावी आले होते.पोहण्यासाठी आम्ही सर्वजण मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी आलो होतो.माझा मित्रांना मी समुद्रात पोहण्यासाठी जावू नका असे सांगत होतो.तरीही ते पाण्यात उतरले व ही दुर्दैवी घटना घडली.चैतन्य गुरव याला चांगले पोहता येत होते.तरीही तो पाण्यात बुडाला अशी माहिती स्थानिकांनी दिली.

किनाऱ्यावरील पर्यटकांची सुरक्षा ऐरणीवर

सध्याचा पर्यटन हंगामात मोठ्या प्रमाणात पर्यटक देवगड तालुक्यातील पर्यटनस्थळांवर दाखल झाले असून समुद्रकिनाऱ्यावरही पर्यटकांची उच्चांकी गर्दी दिसत आहे.मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी घडलेल्या घटनेदरम्यान तेथेही पर्यटकांची गर्दी होती.बुडणारे युवक मदतीची याचना करीत असतानाही तेथे उपस्थित असलेल्या पर्यटकांनी बघ्याची भुमिका घेतली.मात्र स्थानिकांनी मदतकार्य राबविले नसते तर अजुन मोठा अनर्थ घडला असता. समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षारक्षकही तैनात नव्हते.त्यामूळे गर्दीने फुललेल्या अशा समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.