
सावंतवाडी : मागील महिन्यांपूर्वी मळेवाड जकात नाका तसेच मळेवाड ते आजगाव सावरदेव पर्यंतचा रस्ता हा डांबरीकरण ,खडीकरण करून खड्डेमुक्त करण्यात आला होता. मात्र या रस्त्यावर खडीकरण,डांबरीकरण झाल्यावर पावसामुळे या रस्त्यावरील केलेले डांबरीकरण खराब होऊन मळेवाड जकातनाका येथील उतारावर (कोंडुरे कडे जाणारा रस्ता) तसेच मळेवाड पूल, सावळवाडी येथील रस्त्यावर अक्षरश: भले मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावर अपघात घडत असून, धोका वाढतच चालला आहे.
वाहन चालकांना सुद्धा हे खड्डे चुकविताना सध्या मोठी कसरतच करावी लागत आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून येथील स्थानिक ग्रामस्थांनी या रस्त्यावर वारंवार अपघात घडत असल्यामुळे आपल्या परीने हे खड्डे बुजविण्याचे प्रयत्न केले. मात्र, रस्त्यावरील डांबरीकरण खडीकरण बहुतांशी खराब होऊन त्यावर मोठे खड्डे पडले आहेत.मात्र संबंधित विभाग व ठेकदार निद्रिस्त असल्याचे दिसून येते. निदान आतातरी पाऊस गेल्यामुळे हे पडलेले खड्डे तत्काळ बुजवावेत अशी मागणी वाहनचालक ग्रामस्थ करीत आहेत. पाऊस गेला, रस्त्यावरील खड्डे बुजविणार कधी? असा सवाल ग्रामस्थ,वाहनधारक करत आहेत. रस्त्यावरील डांबरीकरण खडीकरण बहुतांशी खराब होऊन त्यावर मोठे खड्डे पडले असून या नवीन डांबरीकरण केलेल्या रस्त्यावरील पडले खड्डे आता तरी बुजविण्यात यावेत जेणेकरून या खड्ड्यांमुळे होणारे अपघात टाळता येतील. रस्त्यावरील डांबरीकरण खडीकरण उखडल्याने रस्त्यावरील खड्डे अधिकच रुंदावत आहेत, रस्त्यावरील खडी ,दगड रस्त्यावर पसरल्याने गाड्या स्लीप होण्याचे प्रकार वाढतच चालले आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने, ठेकेदाराने लवकरात लवकर खड्डे बुजवून पुढील संभाव्य धोका टाळावा .












