
वैभववाडी : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून चोरट्यांनी आता ग्रामीण भागाकडे मोर्चा वळवला आहे. नाधवडे येथील शिडवणे मार्गावरील परशुराम ईस्वलकर यांचा बंद असलेला बंगला फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दीड ते दोन लाख रुपयांच साहित्य लंपास केले आहे.
ही घटना गुरुवारी (२८ मार्च) रात्री घडल्याचा अंदाज असून चोरट्यांनी बंगल्याचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातील फ्रीज, इनव्हर्टर, दोन गॅस सिलेंडर, स्टीलची भांडी, देवपूजेचे साहित्य, बाथरूममधील नळ तसेच कपड्यांच्या बॅगा असा मोठ्या प्रमाणावर ऐवज चोरीस गेला आहे.
दरम्यान, स्थानिक व्यक्तीला बंगल्याचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी मालकांना माहिती दिली. त्यानंतर ईस्वलकर यांनी घटनास्थळी धाव घेतली असता घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत आढळले.
माहिती मिळताच वैभववाडी पोलीस, स्थानिक गुन्हा अन्वेषण पथक व श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथकाने माग काढत रस्त्यापर्यंत धाव घेतली, मात्र पुढील ठोस सुगावा लागला नाही.शहरात अलीकडेच दोन दुचाकी चोरीच्या घटना घडल्यानंतर आता ग्रामीण भागातही चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.












