
सावंतवाडी : फिटनेस योग फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्यावतीने आयोजित 30 दिवसीय योग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारंभ शनिवारी सावंतवाडी येथील जिमखाना हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 1 जुलै ते 30 जुलै या कालावधीत 100 तासांचे हे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात योगाचा प्रसार वेगाने व्हावा या उद्देशाने आयोजित या शिबिरात ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही स्वरूपात एकूण 55 योग शिक्षकांनी सहभाग नोंदविला. सांगता समारंभाला सावंतवाडी नगरपरिषदेचे सभापती आनंद नेवगी, नगरसेविका सीमा नाईक, फिटनेस योग अकॅडमीचे उपाध्यक्ष अनिल मेस्त्री, फिटनेस युवा अकॅडमीचे जिल्हाध्यक्ष नारायण सावंत, फिटनेस किड्स अकॅडमीचे जिल्हाध्यक्ष विशाल लातये, फिटनेस महिला अकॅडमीच्या अध्यक्षा रसिका सावंत, कोषाध्यक्ष अरुण पवार, योगिता आरोसकर आणि विनया तावडे हे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते 30 दिवस अविरत प्रशिक्षण देणारे योगशिक्षक शेखर बांदेकर यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. शिबिरार्थींनीही बांदेकर सरांचे आभार मानले. शिबिरासाठी जिमखाना हॉल, स्टेज व साऊंड सिस्टिम मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल सावंतवाडी नगरपालिकेचे आभार मानण्यात आले. यावेळी नगरसेवक आनंद नेवगी यांनी सांगितले की, शिबिर संपले तरी योगाभ्यास थांबणार नाही. सावंतवाडी येथे 4 ऑगस्ट 2026 पासून निःशुल्क फिटनेस योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.












