
सिंधुदुर्ग : कोकणातील उद्योजकांच्या, नव उद्योजकांच्या आणि लहान-मोठ्या व्यापाऱ्यांच्या शासन स्तरावर अनेक समस्या आहेत. विशेषत: आवश्यक वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने अनेक उद्योजक हे आज अडचणीत आहेत. अशा महत्त्वपूर्ण समस्या ताकदीने शासन दरबारी मांडून त्याचा पाठपुरावा करून वेळेत मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज अँन्ड अँग्रीकल्चरचे नवनिर्वाचित कोकण विभागीय उपाध्यक्ष डॉ.संतोष राणे यांनी केले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज अँन्ड अँग्रीकल्चरच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत चेंबरचे बिनविरोध निवडून आलेले अध्यक्ष रविंद्र माणगावे यांच्या नेतृत्वाखाली एकता पॅनेलमधून महाराष्ट्रातून सर्व विभागातून सन २०२६ ते २०२८ या द्विवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पदभार स्वीकारण्याचा सोहळा मुंबई येथे यशवंतराव चव्हाण केंद्रात संपन्न झाला. या समारंभात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संतोष राणे यांनी हा पदभार स्वीकारला.
यावेळी श्री. राणे म्हणाले, सिंधुदुर्ग हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. आज तीस वर्ष झाली तरी पर्यटनदृष्ट्या ज्या गतीने या जिल्ह्याचा विकास व्हायला हवा त्या दृष्टीने झालेला नाही. म्हणून, शासन व चेंबर यांच्या सहकार्याने कोकणच्या शाश्वत विकासाचा एक रोड मॅप सादर करुन त्याची निर्धारित वेळेत अंमलबजावणी करण्यासाठी चेंबर आग्रही असल्याचे सांगितले. दरम्यान, सकाळच्या सत्रात नवनिर्वाचित समितीला मार्गदर्शन करताना राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यापुढील काळात आपला विभाग व चेंबर हातात हात घालून महाराष्ट्रात उद्योजकांच्या समस्या निवारण करण्यासाठी प्रयत्न करणार असून त्याचाच एक भाग म्हणून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात चेंबर,उद्योजक व शासन यांच्या संयुक्त मिटिंग घेणार असल्याचे जाहीर केले. तसेच बदलती उद्योगनीती आणि उद्योजकानां येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन उद्योजकांना योग्य मार्गदर्शन व्हावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेठ वालचंद एक्सीलन्सी केंद्र सुरु करणार असल्याचे सुतोवाच केले.
या सोहळ्यात चेंबरच्या नवीन पदाधिकाऱ्यांना संबोधित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आवर्जून उपस्थित होते. यावेळी संबोधित करताना ते म्हणाले, औद्योगिक क्षेत्रातील नवीन आव्हाने पेलण्यासाठी राज्यातील उद्योजकांनी आता सज्ज राहिले पाहिजे, यासाठी चेंबरचे तरूण व कार्यक्षम अध्यक्ष रविंद्र माणगावे यांनी व त्यांच्या सर्व नवनिर्वाचित टीमने शासनाशी सुसंवाद ठेवून सकारात्मक विचाराने पुढील वाटचाल केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. यासाठी चेंबर व शासन यांच्यामध्ये आपण एक सामंजस्य करार करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. कोकणातील चेंबरच्या सर्वच निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा आणि नवनिर्वाचित उपाध्यक्ष श्री. राणे यांचा सन्मान करताना अध्यक्ष माणगावे यानी चेंबरला आता शंभर वर्ष पूर्ण होणार असून या शतक महोत्सवी वर्षांत इतकी वर्ष चेंबरच्या कामात मागे राहिलेला कोकण आता संतोष राणे यांच्या अभ्यासू व दमदार नेतृत्वाखाली लक्षवेधी काम करेल असा आशावाद व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या पदभार ग्रहण सोहळ्यासाठी नवनिर्वाचित कौन्सिल सदस्य राजन नाईक, ॲड नकुल पार्सॅकर, विजय केनवडेकर, कुणाल वरसकर आदी उपस्थित होते.










