
सामाजिक कार्यकर्त्यांचा गंभीर आरोप
सावंतवाडी : सावंतवाडी तहसीलदार यांच्याकडे असलेला उपविभागीय अधिकारी पदाचा प्रभारी कार्यभार अचानक काढून घेऊन तो रत्नागिरी जिल्ह्यातील तथा तत्कालीन कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे सोपविण्याचा निर्णय प्रशासनाने तडकाफडाकी घेतला आहे. या निर्णयामुळे महसूल विभागाचा सावळा गोंधळ चालू आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्ते गुरुदास गवंडे यांनी केला आहे.
सावंतवाडी उपविभागीय अधिकारी समीर घारे यांची प्रशासनाने नियुक्ती केल्यानंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर त्यांचा प्रभारी अधिकारी कार्यभार सिंधुदुर्ग जिल्हा भूसंपादन अधिकारी श्रीमती शारदा पवार यांच्याकडे देण्यात आला होता. त्याही अचानक रजेवर गेल्यामुळे तात्पुरता चार्ज पुन्हा सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे देण्यात आला. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनामध्ये कुठेतरी पाणी मुरतंय आणि काहीतरी लुपाछुपी होत आहे. त्याकरिता सावंतवाडी तहसीलदार त्या दर्जाचे अधिकारी नसताना कोणत्या अधिकाऱ्याखाली त्यांना उपविभागीय महसूल अधिकारी म्हणून पदभार देण्यात आला होता ? यामागे कोणाचा हात आहे ? हे पाहणं गरजेचं आहे. नुकतेच येऊन गेलेले महसूल अप्पर सचिव यांचा झालेला सिंधुदुर्ग दौरा त्यानंतर झालेल्या या एकाच जाग्यावर तीन अधिकारी नेमून प्रशासनाला काय साध्य करायचं होतं? यामागे आजगाव, धाकोरे येथे मायनिंगची सूत्र तर हलवली जात नाही ना ? असा संशय सामाजिक कार्यकर्ते गुरुदास गवंडे यांनी व्यक्त केला आहे. सावंतवाडीसारख्या महत्त्वाच्या तालुक्यात अन्य जिल्ह्यातून अधिकारी आणून बसवण्यामागे उद्देश काय आहे ? आणि कार्यभार सोपविण्याची गरज काय होती ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासनाने अधिकृत स्पष्टीकरण देणे आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली आहे.












