LIVE UPDATES

Kankavli News : गणेशोत्सव काळात कणकवली शहरातील वाहतुकीत बदल

12 ते 25 सप्टेंबरदरम्यान अवजड वाहनांना प्रवेशबंदी; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 11, 2026 13:41 PM
views 47  views

सिंधुदुर्गनगरी : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहर व परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी, वाहतूक कोंडी होऊ नये तसेच नागरिकांची गैरसोय व अपघात टाळण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांकडून कणकवली शहरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. (Ganeshotsav 2026)

गणेशोत्सव 14 सप्टेंबर 2026 पासून सुरू होत असून, या कालावधीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाविक व नागरिक विविध वाहनांतून ये-जा करण्याची शक्यता आहे. तसेच कणकवली शहर व परिसरातील बाजारपेठांमध्ये गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे वाहतूक नियोजन करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम 34 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून 12 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 8 वाजेपासून 25 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे वाहतूक बदल लागू केले आहेत.

अवजड वाहनांना प्रवेश बंदी

पटवर्धन चौक, कणकवली येथून कलमठ मार्गे आचरा जाणारी तसेच आचरा-कलमठ मार्गे कणकवलीकडे येणारी अवजड वाहने पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. 

हलक्या व इतर वाहनांसाठी एकेरी मार्ग

पटवर्धन चौक, कणकवली ते लक्ष्मी चित्रमंदिर या मार्गावरून कलमठ मार्गे आचरा जाण्यासाठी तसेच कलमठ मार्गे कणकवली बाजारपेठेकडे येण्यासाठी एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.

पर्यायी मार्ग

हलक्या व इतर वाहनांनी लक्ष्मी चित्रमंदिर ते किनई रोड, गांगोमंदिर मार्गे कणकवली बाजारपेठ रोडचा वापर करावा.

अत्यावश्यक सेवांना सूट

या वाहतूक बदलाचा आदेश पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही. 

गणेशोत्सव काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी केले आहे.