नदीपात्रात आढळला ज्येष्ठाचा मृतदेह

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: March 04, 2026 20:48 PM
views 42  views

कणकवली : कणकवली शहरातील कनकनगर येथील परबवाडी स्मशानभूमी रस्त्यालगत असलेल्या गडनदी पात्रातील 'करकीची कोंड' येथे मध्यप्रदेश येथील आण्णा भिया मोरे पटेल (५५) यांचा मृतदेह आढळून आला. ही घटना मंगळवारी सकाळी ११.३० वा. च्या सुमारास उघडकीस आली.

जॅकवेलवर काम करणाऱ्या व्यक्तीला काहीतरी कुजल्यासारखा वास आला. त्यामुळे त्याने परिसरात पाहणी केली असता पालथ्या स्थितीत पाण्यावर तरंगत असलेला पुरुषाचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ याची माहिती कणकवली नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना दिली. नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती दूरध्वनीद्वारे कणकवली पोलीसांना कळवली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. अथक प्रयत्नानंतर सायंकाळी मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते उत्तम पुजारे, नगरपंचायतीचे सफाई कर्मचारी तसेच पोलीस निरीक्षक तेजस नलावडे, उपनिरीक्षक महेश शेडगे, हवालदार संतोष शिदि, कॉन्स्टेबल सचिन माने, सागर जाधव आणि नगरपंचायत कर्मचारी मनोज धुमाळे, प्रशांत पिळणकर, प्रशांत राणे, प्रकाश राठोड आदी उपस्थित होते.

मृताच्या उजव्या हातावर ॐ चे गोंदण कोरलेले होते आणि हाताला धागा बांधलेला होता. त्यावरून पोलीसांनी तपासणी केली असता त्या वर्णनाची व्यक्ती कणकवली रेल्वे परिसरात दिसल्याचे समोर आले. रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्या मृत व्यक्तीचे नाव आण्णा मोरे पटेल असल्याचे समजले. आण्णा मोरे पटेल हे मध्यप्रदेशातून कामानिमित्त आलेल्या तीन जणांच्या गटातील एक असल्याचे समोर आले. २८. फेब्रुवारीला ते कणकवलीत उत्तरले होते. आण्णा हे काहीसे मानसिक तणावाखाली किंवा विचलित मनस्थितीत होते, अशीही माहिती तपासात पुढे आली आहे.