
सिंधुदुर्ग : तुम्हाला ही एखाद्या हॉरर सिनेमाची स्टोरी वाटेल. पण, ही स्टोरी नाही तर त्या स्टोरीलाही मागे टाकेल अशी सत्य घटना आहे. सहा महिन्यांपासून घरात अचानक पेटणारे कपडे, दप्तरं, जळणाऱ्या गवताच्या गंज्या आणि भिंतीवर आपोआप उमटणारे भयावह संदेश. जिल्ह्यातील एका तालुक्यात घडणारी ही घटना अन् त्यामुळे पुरते दहशतीखाली असलेल कुटुंब. मात्र, या 'भानामती'चा हा थरार अखेर संपुष्टात आलाय. अंनिसने या भोंदूगिरीचा बुरखा टराटरा फाडलाय.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या टीमने अत्यंत चाणाक्षपणे शोधमोहीम राबवून या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावलाय. गेल्या सहा महिन्यांपासून या कुटुंबात थरकाप उडवणाऱ्या घटना घडत होत्या. कधी लहान मुलांची दप्तरे आणि पुस्तके अचानक पेटायची. तर कधी घरातील प्लास्टिकच्या खुर्च्या, टेबल आणि तांदळाच्या पोत्यांना आग लागायची. रात्रीच्या वेळी अचानक गवताची गंजी भडकायची तर कधी थेट भिंतींवर आपोआप भीतीदायक संदेश आणि चित्रे उमटायची. एखाद्या, हॉलिवूड, बॉलिवूडच्या हॉरर सिनेमांना मागे टाकणारी ही स्टोरी प्रत्यक्षात घडत होती. त्यामुळे गावातही दहशतीच वातावरण निर्माण झाले होते
या विचित्र प्रकारामुळे संबंधित कुटुंब भीतीच्या सावटाखाली जगत होत. याची माहिती मिळताच 'अखिल भारतीय अंनिस'चे जिल्हाध्यक्ष ॲड. राजीव बिले, उपाध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, कार्याध्यक्ष विजय चौकेकर आणि अजित कानशिडे यांच्या पथकाने तात्काळ या प्रकरणात हस्तक्षेप केला. सुरुवातीला जमिनीचा वाद, लेझर किंवा ड्रोनचा वापर यांसारख्या शक्यता तपासण्यात आल्या. परंतु, घर एकांतात असल्याने आणि बाहेरील व्यक्तीचा प्रवेश अशक्य असल्याने समितीने शास्त्रीय मार्ग अवलंबला.
अंधश्रद्धा किंवा 'अतृप्त आत्म्याचा' बनाव फेटाळून लावत पथकाने घरात गुपचूप ४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. कॅमेरे लावल्यानंतर सलग तीन दिवस आगीची एकही घटना घडली नाही. यावरून 'भानामती' बाहेरील कोणतीही नसून घरातीलच व्यक्तीची मानसिक कृती असल्याचा ठाम निष्कर्ष समितीने काढला गेला. त्यानंतर पथकाने घरातील सदस्यांची एक-एक करून मानसशास्त्रीय पद्धतीने चौकशी केली अन् या भयंकर खेळामागचा खरा चेहरा समोर आला.
आरोपांचे सत्र सुरू न करता ॲड. राजीव बिले आणि टीमने कौटुंबिक नात्यांचे महत्त्व कुटुंबाला पटवून दिले. कोणत्याही कोर्ट-कचेऱ्या किंवा भांडणांशिवाय, अतिशय संवेदनशीलतेने समुपदेशन करून ही केस यशस्वीपणे हाताळण्यात आली. तर कोणतीही भानामती किंवा करणी नसते, हे मानवी मनाचे आणि विकृतीचे खेळ असतात हे पुन्हा एकदा सिद्ध करत अंनिसने त्या कुटुंबाला भीतीच्या पाशातून मुक्त केलेय. संपूर्ण जिल्ह्यात या कारवाईचे कौतुक होतेय.












