
सावंतवाडी : 'हर घर तिरंगा' अभियानात सिंधुदुर्गाने दमदार कामगिरी केली आहे. या अभियानांतर्गत ‘सेल्फी विथ तिरंगा’ उपक्रमात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाने राज्यात थेट दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर आंबोली मंडळाने तब्बल १०५० अटेंडन्स दाखवत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. यासाठी माजी सैनिक, पक्षाचे नेते, देशप्रेमींचे भाजप युवा नेते विशाल परब यांनी आभार व्यक्त केले आहेत.
श्री. परब म्हणाले, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर राबविण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि अभियानाचे संयोजक संदीप गावडे यांनी या अभियानाची धुरा सांभाळली. जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये भव्य तिरंगा रॅलीसह विविध देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यासोबतच ‘सेल्फी विथ तिरंगा’ उपक्रमातही भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. याच उपक्रमात आंबोली मंडळाने १०५० अटेंडन्सची नोंद करत, सरल ॲपवर प्रभावी रिपोर्टिंग केली व जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाने राज्यात दुसरा क्रमांक पटकावत सिंधुदुर्गाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.
कणकवली विधानसभा मतदारसंघानेही दमदार कामगिरी करत राज्यात सहावा क्रमांक मिळवला. कणकवली शहर आणि कणकवली ग्रामीण मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात तिरंगा सेल्फी अपलोड करत अभियानाला चांगला प्रतिसाद दिला. तर कुडाळ विधानसभा मतदारसंघाने राज्यात दहावा क्रमांक मिळवला. कुडाळ मंडळाच्या कामगिरीमुळे या अभियानात कुडाळ विधानसभा देखील राज्याच्या क्रमवारीत अग्रस्थानी राहिली.
विशेष म्हणजे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाने राज्यात तिसरा क्रमांक मिळवला, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. त्यामुळे पुढील वेळी सिंधुदुर्गाला राज्यात पहिल्या क्रमांकावर नेण्याचा संकल्प असल्याचा विश्वास भाजपा युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केला आहे.
या अभियानाच्या यशासाठी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी घेतलेल्या मेहनतीचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. अभियानाचे संयोजक संदीप गावडे आणी विशाल परब यांच्या नियोजनामुळे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अभियानाला मोठे यश मिळाले. युवा मोर्चाचे संदीप मेस्त्री आणि महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांचेही महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः सिंधुदुर्गातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील तिरंगा रॅलींमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे तिरंगा रॅलीतील सहभागाच्या संख्येतही सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यात अग्रक्रम मिळवला.










