LIVE UPDATES

भंगसाळ नदी सुशोभीकरणाचे आश्वासन पूर्णत्वास : वैभव नाईक

विकास कामांवरून पुन्हा राजकीय वातावरण तापणार
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 11, 2026 14:33 PM
views 94  views
#kokansadlive#news update#konkan update#

कुडाळ : कुडाळ शहरा जवळून वाहणाऱ्या भंगसाळ नदीच्या सुशोभीकरणावरून कुडाळ नगरपंचायतमधील सत्ताधारी आणि विरोधक (ठाकरे सेना) यांच्यात श्रेयवादाची लढाई रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माजी आमदार वैभव नाईक यांनी भंगसाळ नदीच्या सुशोभीकरण कामाची पाहणी केली. या वेळी बोलताना त्यांनी, तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात या प्रकल्पासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला होता आणि तत्कालीन आश्वासन आता पूर्णत्वास येत असल्याचे स्पष्ट केले. नगरपंचायतीने योग्य पाठपुरावा न केल्यामुळे काही कामे खोळंबली असली, तरी ठाकरे सेना पाठपुरावा करून ती पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार निलेश राणे यांनी या विकास कामांची भूमिपूजन केले होते मात्र आता या कामांचे श्रेय हे माजी आमदार घेत असल्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

पक्षचिन्हाच्या केसला आता पाचवे वर्ष सुरू झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्याच बाजूने आहे, परंतु सरकार दबावाचे राजकारण करत असल्याने निर्णयाला उशीर होत आहे. हा निकाल आधी लागला असता तर निवडणूक निकालांचे चित्र वेगळे असते, तरीही अंतिम निकाल आमच्याच बाजूने लागेल, असे वैभव नाईक म्हणाले.

शरद पवारांची राष्ट्रवादी नेहमी सत्तेसोबत राहिली आहे. त्यामुळे यापुढील काळात स्थानिक किंवा राज्य पातळीवर काम करताना त्यांना सोबत घ्यायचे की नाही, याचा विचार पक्षनेतृत्वाने केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

महामार्गाचे काम १२ वर्षांपासून रखडले आहे. शिवसेनेने आंदोलन केले तेव्हा शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले. प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळेच हा रस्ता अपूर्ण राहिला असून, राज ठाकरे यांचे म्हणणे अगदी खरे आहे, महामार्गाचे काम हे आता टक्केवारीवर सुरू असल्याचा आरोप यावेळी माजी आमदारांनी केला आहे. नवीन सुरू असलेले ब्रिज काम चालू असतानाच पडण्याच्या मार्गावरती आले आहेत असे देखील ते यावेळी म्हणाले. 

कुंभवडे धबधब्यावर परजिल्ह्यातील पर्यटकांकडून घडलेल्या अनुचित प्रकाराला पोलीस आणि जिल्हा प्रशासनच जबाबदार असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनावर टीका केली. आंबोली आणि कुंभवडे यांसारखे सिंधुदुर्गातील धबधबे आता देशभरात प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे पर्यटन नगरीची अपकीर्ती टाळण्यासाठी किमान सुट्टीच्या दिवशी प्रमुख पर्यटन स्थळांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा, अशी मागणी नाईक यांनी केली.यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांच्यासोबत अमरसेन सावंत, नगरसेवक मंदार शिरसाट व कार्यकर्ते उपस्थित होते.