
कुडाळ : ऐन गणेशोत्सवाच्या काळात कुडाळ रेल्वे स्थानक परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याचे समोर आले आहे. प्रवाशांच्या विश्रांतीसाठी स्थानकाबाहेर करण्यात आलेल्या सुशोभीकरणाच्या व बैठकीच्या जागेत आणि त्या शेजारील रिक्षा स्टँडवर मागील चार दिवसांपासून एका चायनीज कॉर्नरचे सांडपाणी उघड्यावर साचले आहे.
या सांडपाण्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून, गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणारे मुंबईकर चाकरमानी आणि स्थानिक रिक्षाचालक पुरते त्रस्त झाले आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दररोज हजारो प्रवासी मुंबईहून कुडाळ स्थानकावर उतरत आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे स्थानकाबाहेर सुशोभीकरण करून आकर्षक बैठक व्यवस्था उभारण्यात आली आहे.
मात्र, स्थानकाबाहेरच असलेल्या एका चायनीज कॉर्नरचे दूषित पाणी थेट या बैठकीच्या जागेत आणि लगतच्या रिक्षा स्टँडवर साचत आहे. गेल्या चार दिवसांपासून हा पाण्याचा स्त्राव सुरू असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऐन सणाच्या काळात हक्काच्या बैठकीच्या जागेत घाण पाणी पसरल्याने चाकरमान्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या दुर्गंधीमुळे हैराण झालेल्या स्थानिक रिक्षाचालकांनी अखेर रेल्वे स्थानकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. प्रवाशांचे होणारे हाल आणि अस्वच्छता लक्षात घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांनी तात्काळ या घटनेची दखल घेतली. संबंधित चायनीज कॉर्नरच्या दुकानदाराला या सांडपाण्याची त्वरित व योग्य व्यवस्था करण्याचे कडक निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.










