
सावंतवाडी : आडाळी एमआयडीसीसाठी नेण्यात येणारी ३३ केव्ही क्षमतेची विद्युत वाहिनी बांदा शहरातून भूमिगत पद्धतीने नेण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांच्यासह स्थानिक शिष्टमंडळाने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या मागणीची तातडीने दखल घेत उद्योगमंत्र्यांनी ओरोस येथील बैठकीत ही ३ किलोमीटरची लाईन भूमिगत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संजु परब यांनी सहकार्य केले असे साईप्रसाद काणेकर यांनी सांगितले. बांदा हे सावंतवाडी तालुक्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत वसलेले शहर आहे. शहरातून जाणाऱ्या वाढत्या वाहतुकीचा ताण, नागरिकांची सुरक्षितता आणि भविष्यातील नागरी विकास लक्षात घेता ही उच्चदाब वाहिनी उघड्यावर न ठेवता भूमिगत करणे अत्यंत आवश्यक होते.
यासाठी बांदा साईप्रसाद काणेकर, पंचायत समिती सदस्या ऋतिका नाईक आणि ओंकार नाडकर्णी यांच्या शिष्टमंडळाने उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात बांदा पोलीस चेक पोस्ट ते पानवळ या ३ किलोमीटरच्या अंतरातील विद्युत वाहिनी भूमिगत करण्याची मागणी करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणासाठी आणि कामाच्या पाठपुराव्यासाठी शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी यशस्वी शिष्टाई केली. त्यांच्या प्रभावी मध्यस्थीमुळेच या मागणीला गती मिळाली.
या निवेदनाची गंभीर दखल घेत, ओरोस येथे एमआयडीसी संदर्भात पार पडलेल्या बैठकीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संबंधित यंत्रणेला ३ किमीची ३३ केव्ही लाईन तातडीने भूमिगत करण्याचे निर्देश दिले. हा सुरक्षेचा प्रश्न तातडीने मार्गी लागल्याबद्दल आणि यशस्वी पाठपुराव्याबद्दल बांदा शहराच्यावतीने संजु परब यांचे विशेष आभार मानण्यात आले असून नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








