LIVE UPDATES

बेळगावातील युनियन जिमखाना क्लबमध्ये खूनाचा प्रयत्न

हवेत गोळीबार करत संशयित आरोपींचे पलायन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 15, 2026 18:17 PM
views 15  views

बेळगाव : शहरातील बोगारवेस चौकाजवळ असलेल्या युनियन जिमखाना क्लबमध्ये मंगळवारी रात्री घडलेल्या थरारक घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली. पोलीस आयुक्तांच्या कार्यालयालगत असलेल्या या क्लबमध्ये एका व्यक्तीच्या खूनाचा प्रयत्न झाल्यानंतर आरोपींनी हवेत गोळीबार करत घटनास्थळावरून पलायन केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश जालगार यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने तीन अज्ञात व्यक्ती क्लबच्या रमी विभागात दाखल झाल्या. यावेळी एका आरोपीने जालगार यांच्या डोक्यावर पिस्तूल रोखून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रसंगावधान राखत हल्लेखोराला जोरदार धक्का दिला आणि अंधाराचा फायदा घेत तेथून निसटण्यात यश मिळवले.खुनाचा प्रयत्न फसल्याने संतप्त झालेल्या आरोपींनी क्लबबाहेर येऊन हवेत दोन फायर केले. गोळीबाराचा आवाज परिसरात घुमताच नागरिकांमध्ये घबराट पसरली. काही क्षणांतच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

घटना पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाच्या अगदी शेजारी घडल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. शहरातील अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या भागात अशा प्रकारे सशस्त्र आरोपींनी प्रवेश करून हल्ला करणे आणि नंतर पळ काढणे ही बाब गंभीर मानली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त भूषण बोऱसे यांनी न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्राथमिक तपासात हल्ल्यामागे जुने वैमनस्य असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तथापि, इतर कोणतेही गुन्हेगारी संबंध आहेत का, याचाही तपास सुरू आहे.कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, घटनास्थळावरील पुरावे संकलित करणे आणि हल्ल्यात वापरण्यात आलेल्या शस्त्राचा माग काढणे यावर तपासाचा भर आहे.दरम्यान, या घटनेनंतर युनियन जिमखाना क्लबमध्ये सुरू असल्याचा आरोप असलेल्या जुगाराच्या हालचालींबाबतही चर्चा रंगू लागली आहे. पोलिसांच्या कार्यालयाच्या अगदी जवळ अशा हालचाली दीर्घकाळ सुरू राहिल्या कशा, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.