
चिपळूण : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) राज्यव्यापी धडक कारवाईचे पडसाद आता थेट कोकणात उमटले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे ATS ने मध्यरात्री कारवाई करत एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.ही कारवाई पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संबंधित कथित डिजिटल संपर्कांच्या तपासाचा भाग असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यभर एकाचवेळी सुमारे १५० ठिकाणी ATS ने छापेमारी केली. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड येथे झालेल्या कारवाईत काही संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर तपासातून मिळालेल्या धागेदोऱ्यांच्या आधारे ATS चे पथक चिपळूणपर्यंत पोहोचल्याचे समजते.तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टीच्या कथित सोशल मीडिया व डिजिटल 'युजर आयडी' च्या माध्यमातून महाराष्ट्रातील काही युवक संपर्कात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.या संपूर्ण प्रकरणात अनेक संशयित ATS च्या रडारवर असून, त्यांच्या डिजिटल व्यवहारांची, मोबाईल डेटाची आणि संपर्क साखळीची कसून छाननी सुरू आहे.चिपळूणमधील संशयिताकडून मोबाईल, सोशल मीडिया अकाउंट्स, चॅट्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची तपासणी केली जात असल्याची माहिती आहे.या चौकशीतून आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.कोकणासारख्या शांत जिल्ह्यात ATS ची अशी कारवाई झाल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.या घटनेनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.या प्रकरणात संबंधित व्यक्तीचा संपर्क केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित होता की त्यामागे गुन्हेगारी किंवा दहशतवादी स्वरूपाचे व्यापक जाळे कार्यरत होते,याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही.ATS कडून तपास सुरू असून, अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणपर्यंत पोहोचलेले हे तपासाचे धागेदोरे राज्याच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहेत.या प्रकरणात पुढील काही दिवसांत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता असून, कोकणासह संपूर्ण राज्याचे लक्ष आता Ats च्या पुढील कारवाईकडे लागले आहे.










