LIVE UPDATES

बंधा-यात बुडून मुंबईतील तरुणाचा दुर्दैवी अंत

कोकीसरे येथील घटना
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 12, 2026 14:24 PM
views 231  views

वैभववाडी : प्रतिनिधी

कोकीसरे येथील बंधा-यात बुडून मुंबईतील तेवीस वर्षीय तरुणाचा  दुर्दैवी मृत्यू झाला.  सिद्धांत प्रकाश जाधव ( रा. तारारोड, शिवाजी नगर, सांताक्रूझ, मुंबई) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद वळंजू यांच्यासह मुंबईतील चौदा जणांचा मित्रांचा गृप १० जुलै रोजी कोकिसरे येथे फिरण्यासाठी आला होता. शनिवारी ११ जुलैला दुपारी या सर्वांनी  पार्टी केल्यानंतर सायंकाळी साडेतीनच्या सुमारास कोकिसरे येथील सार्वजनिक गणपती विसर्जन घाटावरील बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेले. काही मित्र पाण्यात उतरले, तर काहीजण बंधाऱ्यावर बसले होते.सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सिद्धांत जाधव दिसत नसल्याचे मित्रांच्या लक्षात आले. त्याचे कपडे, मोबाईल व चप्पल पाण्याजवळच आढळून आले. त्यानंतर मित्रांनी परिसरात शोधाशोध केली. गावचे पोलीस पाटील व सरपंच यांनाही माहिती देण्यात आली. रात्री वैभववाडी पोलिसांनी घटनास्थळी येऊन शोधमोहीम सुरू केली. मात्र अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले.रविवारी सकाळी पुन्हा पोलीस, मित्र व ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली. सकाळी सुमारे पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास बंधाऱ्यातील सुमारे पंधरा ते वीस फूट खोल पाण्यात सिद्धांत जाधव याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला.सिद्धांत हा मुळ कणकवली येथील नरवडे गावचा आहे.त्याच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे.