
देवगड : माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांच्या नगरसेवक पुत्राविरोधात सुनेने विरार पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमधील गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी महिला आघाडीने आक्रमक भूमिका घेत निष्पक्ष चौकशी, पीडितेला संपूर्ण संरक्षण आणि दोषींवर कठोर कारवाईची जोरदार मागणी केली. देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर आणि भाजपच्या महिला नेत्या प्रियांका साळस्कर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका स्पष्ट केली.
यावेळी पंचायत समिती सदस्या स्नेहा अनुभवणे आणि माजी नगरसेविका प्राजक्ता घाडी उपस्थित होत्या.पत्रकार परिषदेत बोलताना तन्वी चांदोस्कर यांनी सांगितले की, विरार पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरमध्ये विनायक राऊत, त्यांचे नगरसेवक पुत्र आणि इतर संबंधितांविरोधात मानसिक, शारीरिक, आर्थिक छळ, बुवाबाजी तसेच फसवणुकीसारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणातील पीडित महिलेला तातडीने संरक्षण देण्यात यावे आणि कोणताही राजकीय दबाव न येऊ देता निष्पक्ष तपास व्हावा, अशी त्यांनी मागणी केली.
"अनेक वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेल्या व्यक्तींवर असे गंभीर आरोप होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. नैतिकतेची जाणीव ठेवून संबंधितांनी जबाबदारी स्वीकारावी. कायद्यापुढे सर्व समान आहेत. त्यामुळे दोषींवर कोणताही भेदभाव न करता कठोर कारवाई झाली पाहिजे," असे चांदोस्कर यांनी स्पष्ट केले.
भाजप महिला नेत्या प्रियांका साळस्कर यांनीही राऊत कुटुंबावर जोरदार टीका करत, "स्वतःच्या घरातील महिलेलाच न्याय, सन्मान आणि सुरक्षितता देता येत नसेल, तर समाजातील महिलांसाठी काम करण्याचा नैतिक अधिकार राहत नाही. एका महिलेला इतक्या प्रकारे छळ सहन करावा लागल्याचे आरोप अत्यंत गंभीर असून, दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे," असा घणाघात केला.
महिलांवरील अन्यायाविरोधात भारतीय जनता पार्टी महिला आघाडी कायम पीडितांच्या पाठीशी उभी राहील, असा पुनरुच्चार करत न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.










