
प्रकाराची बैठकीत चर्चा
वैभववाडी : जलजीवन मिशन व पाणीटंचाईच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीतच सरपंचांना पिण्याचे पाणी न मिळाल्याचा प्रकार घडल्याने उपस्थितांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या हस्तक्षेपानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी सरपंचांना पाणी व चहा देण्यासाठी धावपळ केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
वैभववाडी पंचायत समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, अधिकारी तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी उपस्थित होते. सुमारे तीन तास चाललेल्या बैठकीदरम्यान पुढील रांगेत बसलेल्या अधिकारी, पदाधिकारी आणि सदस्यांना कर्मचाऱ्यांकडून तीन ते चार वेळा पाणी पुरविण्यात आले. मात्र सभागृहाच्या समोरील बाजूस बसलेल्या सरपंचांकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांना पाणी देण्यात आले नाही. ही बाब करुळचे सरपंच नरेंद्र कोलते यांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. "सरपंच आम्ही येथे केवळ बाहुले म्हणून बसलो आहोत का?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी तात्काळ दखल घेतली. त्यांनी समोरील बाजूस बसलेल्या सरपंच व ग्रामसेवकांनाही पाणी, चहा आदींची व्यवस्था करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या.
या प्रकाराबाबत सीईओंनी नाराजी व्यक्त केल्यानंतर कर्मचाऱ्यांची पाणी व चहाचे वितरण करण्यासाठी धावपळ सुरू झाली. पाणीटंचाईच्या बैठकीतच सरपंचांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागल्याची चर्चा मात्र बैठकीनंतरही रंगली.











