LIVE UPDATES

हत्तींच्या बंदोबस्तासाठी खोदण्यात आलेले खंदक ठरताहेत त्रासदायक

माती, दगड खंदकांमधून वाहून आल्याने दोडामार्ग–विजघर राज्यमार्गावर चिखल
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 23, 2026 20:02 PM
views 32  views

दोडामार्ग : हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी डोंगर परिसरात तयार करण्यात आलेले खंदक आता पावसाळ्यात नागरिकांसाठी अडचणीचे ठरत आहेत. मुसळधार पावसामुळे या खंदकांमधून वाहून आलेली माती, दगड आणि गाळ तिलारी घाटाच्या पायथ्याशी जमा होत आहे. त्यामुळे दोडामार्ग–विजघर राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण होऊन वाहतूक विस्कळीत होत आहे. या प्रकारामुळे वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक ग्रामस्थांना वारंवार त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाच्या उपाययोजनांबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी डोंगर उतारावर विविध ठिकाणी खंदक खोदण्यात आले आहेत. मात्र पावसाळ्यात हेच खंदक डोंगरावरील माती आणि गाळ वाहून आणण्याचे माध्यम बनत आहेत. परिणामी तिलारी घाट परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचत असून वाहनांची ये-जा करणे धोकादायक बनत आहे. चिखलामुळे रस्ता निसरडा होत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. अनेक वेळा वाहने घसरून अडकण्याचे प्रकार घडतात. तसेच रस्त्यावर गाळ साचल्याने काही काळ वाहतूक थांबवावी लागते. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून प्रवाशांना वेळेचा मोठा अपव्यय सहन करावा लागतो.

यंदाच्या पावसाळ्यातही अतिवृष्टीमुळे तिलारी घाटाच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात गाळ साचला. रस्त्यावर चिखलाचे प्रमाण वाढल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. दोन्ही बाजूंनी आलेली वाहने अडकून पडल्याने नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. त्यानंतर प्रशासनाकडून जेसीबीच्या माध्यमातून रस्त्यावरील माती व गाळ हटविण्याचे काम करण्यात आले. मात्र, दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या समस्येवर अद्याप कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करण्याऐवजी  पाण्याचा निचरा सुरळीत करण्यासाठी व्यवस्था उभारणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

हत्ती खंदक ठरताहेत त्रासदायक

हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी खोदण्यात आलेले खंदक आता पावसाळ्यात नागरिकांसाठी अडचणीचे ठरत आहेत. दरवर्षी निर्माण होणाऱ्या या समस्येतून कायमस्वरूपी मुक्तता कधी मिळणार? असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.