
दोडामार्ग : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा, दोडामार्ग नं. १ येथे गुरुवारी २३ जुलै रोजी "बांधावरची शाळा" हा अभिनव शैक्षणिक उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतामध्ये नेऊन शेतीची विविध कामे, भातशेतीचे महत्त्व, शेतीतील पारंपरिक पद्धती तसेच निसर्गाशी असलेले नाते यांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेत शेतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला यावेळी कृषी विस्तार अधिकारी सुजित गायकवाड,अजित कोळी,कृषी सहाय्यक सुमित पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुमित दळवी, मुख्याध्यापक एकता नाईक उपक्रमशील शिक्षक संदीप सावंत, दिगंबर काळे, योगेश पंढरे, प्रगतशील शेतकरी कोचरेकर तसेच पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
वर्गखोलीबाहेर जाऊन अनुभवातून शिक्षण देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण झाली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शेतीचे महत्त्व, शेतकऱ्यांचे कष्ट आणि पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले. या अभिनव उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांनीही कौतुक केले असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना अनुभवाधारित शिक्षणाची संधी मिळत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.










