LIVE UPDATES

विभागीय समितीकडून तुळसुली, अणसुर ग्रामपंचायतींचे मूल्यमापन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान : विकासकामांची पाहणी करून त्यांच्या गुणवत्तेची तपासणी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 23, 2026 20:16 PM
views 29  views

सिंधुदुर्गनगरी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कुडाळ तालुक्यातील तुळसुली आणि वेंगुर्ला तालुक्यातील अणसुर ग्रामपंचायतींची विभागस्तरीय समितीने  पाहणी करत प्रत्यक्ष केलेल्या कामांची क्षेत्रिय तपासणी करुन मुल्यमापन केले. अमरावती विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखालील पथकाने ग्रामपंचायतींच्या कामकाजाची, दस्तऐवजांची आणि प्रत्यक्ष राबविण्यात आलेल्या उपक्रमांची तपासणी केली.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावलेल्या तुळसुली ग्रामपंचायतीची तसेच द्वितीय क्रमांक मिळविलेल्या अणसुर ग्रामपंचायतीची विभागीय स्तरावर निवड झाल्यानंतर या समितीने दोन्ही ग्रामपंचायतींना भेट देत विविध निकषांच्या आधारे मूल्यांकन केले. ग्रामपंचायतींच्या प्रशासकीय नोंदी, शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, लोकसहभाग आणि शाश्वत विकासाच्या उपक्रमांची समितीने बारकाईने पडताळणी केली. यासोबतच प्रत्यक्ष विकासकामांची क्षेत्रीय पाहणी करून त्यांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात आली.

यावेळी विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्यासमवेत अपर आयुक्त (विकास) शालिनी कडू, सहाय्यक आयुक्त (विकास) राजीव फडके, विस्तार अधिकारी (पंचायत) किशोर पांडे तसेच विस्तार अधिकारी (सांख्यिकी) प्रमोद ताडे यांनीही तपासणी प्रक्रियेत सहभाग घेतला. या पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल कबनुरे-पुंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) जयप्रकाश परब, जिल्हा परिषद सदस्य नागेश आईर, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रविण हिर्लेकर, अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर, ग्रामपंचायत अधिकारी सायली सातोसे, ग्रामपंचायत सदस्य सयमी गावडे, प्रज्ञा गावडे, साक्षी गावडे, वामन गावडे, सीमा गावडे, आणि सुधाकर गावडे, अणसुर हायस्कुल मुख्याध्यापक राजेश घाटवळ, विभागीय समन्वयक अमोल पडवळ, ग्रामपंचायत कर्मचारी सुप्रिया गावडे, सोनू गावडे यांच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत व सन्मान करण्यात आला. यावेळी अणसूर पाल हायस्कूलचे सर्व शिक्षक, कर्मचारी वर्ग व विद्यार्थी तसेच आरोग्य अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा सेविका, स्थानिक बचत गटातील महिला, सीआरपी, गावातील तरुण मंडळ आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.