सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात १६ ऑगस्ट पासून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विधानसभेच्या उमेदवार सौ. अर्चना घारे यांनी 'जागर जाणिव यात्रा' सुरू केली. या यात्रेसाठी आम्हाला प्रत्येक गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून गेल्या आठ वर्षात अर्चना घारे यांनी या मतदारसंघात केलेल्या कामाची ही पोचपावती आहे. सावंतवाडी मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा म्हणून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार प्रयत्नशील आहेत. हा मतदारसंघ आम्ही मिळवणारच आणि या मतदारसंघाच्या उमेदवार सौ. अर्चना घारे याच असतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सावंतवाडी येथे आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
जाणीव जागर यात्रेतून या मतदारसंघात फिरताना प्रत्येक गावातील लोकांनी आपल्या व्यथा आमच्यासमोर मांडल्या. गेल्या पंधरा वर्षात या मतदारसंघात काही विकास झाला नाही. असे या मतदारसंघातील जनतेचे म्हणणे आहे. हे शासन विकास करण्यासाठी पूर्ण अपयशी ठरले आहे. येथील स्थानिक आमदार व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना जनतेच्या विकास कामांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. हे सरकार जनतेच्या हिताचे नसून भ्रष्टाचारी सरकार आहे. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडण्याचे काम या सरकारने करून संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावला आहे. या सर्व घटनांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि या सरकारचा भ्रष्टाचार जनते समोर आणण्यासाठी ' हक्क मागतो महाराष्ट्र माझा ' हे घोषवाक्य घेऊन आम्ही संपूर्ण जिल्हा पिंजून काढणार आहोत, असे अमित सामंत यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रात ज्या मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार विधानसभा निवडणूक लढवणार आहे त्याठिकाणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार अमोल कोल्हे यांच्या शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ५ ऑक्टोबर रोजी सावंतवाडीत ही यात्रा पोचणार असून यावेळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या शिव स्वराज्य यात्रेच्या जाहीर सभेनंतर जागर जाणिव यात्रेचा समारोप करण्यात येईल. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी गांधी चौकात येथे सकाळी ११ वाजता भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आता राज्यात विकासासाठी महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही. राज्यात शिवस्वराज्य येणे गरजेचे आहे असे अमित सामंत म्हणाले.
दरम्यान, प्रॉपर्टी विकून राजकारण केले असे म्हणणाऱ्या शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्वतःच्या प्रॉपर्टी दडवल्या या संदर्भात आजही सर्वोच्च न्यायालयात खटले सुरू आहेत. मंत्री झाल्यावरच त्यांच्या प्रॉपर्टी मध्ये वाढ झाली आहे. मात्र प्रॉपर्टी विकली हे सांगून केवळ लोकांची दिशाभूल करून सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा तो प्रयत्न होता असा दावा माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी केला.ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी संपली त्याचप्रमाणे मंत्री दीपक केसरकर यांचीही गॅरंटी संपलेली आहे. मल्टीस्पेशालिटी संदर्भात ते कसे युवराज लखमराजे भोसले यांचा वापर करतील हे त्यांनाही समजणार नाही अशी टीकाही श्री भोसले यांनी केली.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कोकण विभाग महिला अध्यक्ष सौ. अर्चना घारे परब, युवक जिल्हाध्यक्ष विशाल जाधव, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, महिला विधानसभा अध्यक्ष नीतीषा नाईक, विधानसभा युवक अध्यक्ष विवेक गवस, तालुका सरचिटणीस हिदायतुल्ला खान, वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महिला शरअध्यक्ष सायली दुभाषी, जिल्हा कृषी सेल अध्यक्ष समीर आचरेकर, कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, युवती विधानसभा अध्यक्ष सुनीता भाईप, युवक तालुकाध्यक्ष ऋत्विक परब, उद्योग व्यापार विभाग तालुकाध्यक्ष नवल साटेलकर, युवती तालुकाध्यक्ष सुधा सावंत, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष संजय भाईप राजेंद्र वाघाटे, सुजल शेलार आदी उपस्थित होते.