
सावंतवाडी : म्हापसा - गोवा येथील सुप्रसिद्ध श्री देव बोडगेश्वर देवाचा ९१ वा जत्रोत्सव नुकताच संपन्न झाला. या भव्य जत्रोत्सवाचा प्रारंभ 'स्वरभगिनी' या ग्रुपच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजगाव गावच्या सुकन्या ममता दत्तप्रसाद प्रभू आणि वैष्णवी दत्तप्रसाद प्रभू या भगिनींच्या भक्तीमय स्वर रसातून सदर जत्रोत्सवाचा प्रारंभ झाला. या सुरेल मैफिलीत त्यांना तबल्यावर दत्तराज चारी (गोवा), पखवाजावर भावेश करंगुटकर (सिंधुदुर्ग), मंजिरीवर प्रतीक गडेकर (गोवा), हार्मोनियमवर नरेश नागवेकर यांची साथसंगत लाभली.
गोव्यातील सुप्रसिद्ध निवेदक परेश नाईक यांनी आपल्या विशेष शैलीतून या बहारदार कार्यक्रमाचे निवेदन केलं. या सुरेल गायनाच्या कार्यक्रमाला रसिकांचाही उदंड प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमादरम्यान गोव्यातील अनेक प्रतिष्ठित व दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली. तसेच प्रभू भगिनी यांच्या गायनाचा आनंद लुटला.
दरम्यान या सुरेल मैफिलीच्या आयोजनाबद्दल प्रभू भगिनी आणि त्यांच्या गायन कौशल्याचे शिलेदारांचे गोवा व सिंधुदुर्गातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन करत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. दोन्हीही प्रभु भगिनींचे शालेय शिक्षण आजगाव येथील विद्याविहार इंग्लिश स्कूल येथे झाले आहे. या भगिनींचे विशेष अभिनंदन आजगाव गावाच्या प्रथम नागरिक व सरपंच सौ. यशश्री सौदागर, माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र उर्फ अण्णा झांटये यांनी केले आहे.











