इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यावर भर द्यावा : पालकमंत्री नितेश राणे

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 05, 2026 13:35 PM
views 108  views

देवगड : आपले जीवन किती अमूल्य आहे याची जाणीव प्रत्येकाला होणे गरजेचे आहे.तरुणांनी वाहन चालवताना नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेट, तर चारचाकी वाहनचालकांनी सीट बेल्ट वापरणे बंधनकारक आहे. पालकांनीही आपल्या पाल्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती द्यावी.पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देणारे उपक्रम राबवावेत,तसेच पोलिस अधीक्षक कार्यालय व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने असे जनजागृती उपक्रम सातत्याने घ्यावेत, देवगड येथे ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ अंतर्गत आयोजित बाईक रॅलीचे उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री नितेश राणे यांनी संबोधित केले. 

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज देवगड येथे आज रस्ता सुरक्षा अभियान २०२६’उत्साहात संपन्न झाले.जिल्हा पोलिस दलाच्या पोलिस रेजिंग डे निमित्त या उपक्रमाचे आयोजन या वेळी करण्यात आले होते.

पुढे बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करून नागरिकांचे मौल्यवान जीव सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.यासाठी प्रत्येकाने वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक असून, पर्यावरणपूरक धोरणाचा भाग म्हणून यापुढे इलेक्ट्रिक (EV) वाहनांचा वापर वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी केले.

यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे,पोलिस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर,माजी आमदार अजित गोगटे,उपविभागीय अधिकारी जगदीश काटकर, तहसीलदार रमेश पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी,कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाणे करण्यात आली. त्यानंतर भाऊ लोकेगावकर विद्यालय यांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या पथनाट्यातून वाहन चालवताना घ्यावयाची काळजी,व्यसनमुक्ती आणि रस्ते सुरक्षा याबाबत प्रभावी जनजागृती राबविण्यात आली.या बाईक रॅलीच्या माध्यमातून रस्ते सुरक्षा, जबाबदार वाहनचालना आणि पर्यावरणपूरक वाहतुकीचा संदेश प्रभावीपणे राबविण्यात आला.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनीही रस्ते सुरक्षा विषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करताना सांगितले की, “वाहन चालवताना नियमांची माहिती असणे आणि ते प्रत्यक्षात पाळणे, यामुळेच आपली व इतरांची सुरक्षितता सुनिश्चित होऊ शकते असेही त्या म्हणाल्या.यावेळी प्रास्ताविक करताना पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर म्हणाले की, “रस्ता सुरक्षा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी लोकसंख्येची घनता पाहता ते चिंताजनक आहे. राष्ट्रीय महामार्गांप्रमाणेच राज्य मार्गांवरही अपघातांचे प्रमाण अधिक आहे.विशेष म्हणजे, अधिकाधिक अपघात हे बेजबाबदार वाहनचालना व वेगमर्यादा न पाळल्यामुळे घडतात आणि यात तरुणांचे प्रमाण अधिक आहे.ही बाब गंभीर असून प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळणे महात्वाचे आहे.