LIVE UPDATES

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ३९ कोटी ९६ लाखांच्या कामांना मंजूरी

पालकमंत्री नितेश राणेंचे जनतेने मानले आभार
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 18, 2026 14:00 PM
views 258  views

 सिंधुदुर्ग : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत सन २०२६-२७ या वर्षासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामांना मंजुरी देण्यात आली असून तब्बल ३९ कोटी ९६ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. यातील ७ कोटी ९९ लाख २० हजार रूपयांच्या निधीचे वितरण देखील करण्यात आले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून हा विकासनिधी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. 


जिल्ह्यातील जवळपास १५६ गावात या माध्यमातून सौर हायमास्ट दिवे उभारण्यात येणार असून यामुळे जिल्ह्यातील अंधारातील भाग प्रकाशमान होणार आहे. यासाठी राज्य सरकार अन् मंत्री नितेश राणे यांचे जिल्हावासियांनी आभार मानले आहेत. नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा, गावांचा विकास करण्यासाठी या घटकांना मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी सुचविलेल्या कामांना शासनस्तरावरुन मान्यता देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ३९ कोटी ९६ लक्ष इतक्या रक्कमेच्या कामांना व त्याकरिता २० टक्के निधी रुपये ७ कोटी ९९ लक्ष २० हजार रूपये वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात आली आहे.पालकमंत्र्यांनी सुचवलेल्या शिफारशीनुसार ही कामे अत्यंत गतीने पूर्ण केली जाणार आहेत. या मोठ्या निधीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मागासवर्गीय वस्त्यांच्या विकासाला मोठी गती मिळणार असल्याने जिल्ह्यातील जनतेमधून पालकमंत्री नितेश राणे आणि राज्य सरकारचे आभार मानले जात आहेत.