LIVE UPDATES

“संडे ऑन सायकल” विशेष मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

Edited by: स्वप्नील लोके
Published on: May 27, 2026 20:52 PM
views 38  views

देवगड : फिट इंडिया मिशन अंतर्गत अधिक तंदुरुस्त, निरोगी आणि सक्रिय भारत घडविण्याच्या उद्देशाने रविवार, ७ जून २०२६ रोजी “संडे ऑन सायकल” या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी केले आहे.

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये सायकल वापराबाबत जागृती निर्माण करणे हा आहे. पर्यावरण संरक्षण, आरोग्य संवर्धन, स्वच्छता तसेच दैनंदिन जीवनात सायकलचा वापर वाढविण्याबाबत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या मोहिमेअंतर्गत पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत स्तरावर सायकल रॅली, जनजागृती फेरी, स्वच्छता संदेश प्रसार आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतादूत, बचत गट सदस्य, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

“संडे ऑन सायकल” मोहिमेमुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होणार असून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेशही व्यापक स्तरावर पोहोचणार असल्याचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी सांगितले.

सदर मोहिमेत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी फिट इंडिया मिशनच्या

https://fitindia.gov.in/world-bicycle-day या

अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.