वैभव नाईकांवरील ॲट्रॉसिटीचा गुन्हा खोटा असल्याचा आरोप

मराठा समाज एकवटला
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: October 07, 2025 20:23 PM
views 110  views

सिंधुदुर्गनगरी : माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर दाखल करण्यात आलेला ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा विरोधात मराठा समाज एकवटला असून हा गुन्हा  मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अटक संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यास कुडाळ पोलीस निरीक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विरोधात कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करण्याचा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत यांनी दिला आहे.

कुडाळ पोलीस ठाण्यात महामार्ग विभागाचे कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंके यांच्या तक्रारीनुसार माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ही तक्रार खोटी असल्याचा आरोप मराठा महासंघाने केला आहे. कोणत्याही शासकीय कार्यालयात अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर त्याची जात लिहिलेली नसते, असा मुद्दा उपस्थित करत ॲड. सावंत म्हणाले की, "एखाद्या अधिकाऱ्याच्या चुकीकडे लक्ष वेधल्यास तो खोटेपणा लपविण्यासाठी ॲट्रॉसिटीचा आधार घेत असेल, तर लोकशाही यंत्रणाच धोक्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. 

तसेच सर्वोच्च न्यायालयाने अर्नेश कुमार विरुद्ध बिहार राज्य या खटल्यात सात वर्षांपर्यंतच्या शिक्षेच्या गुन्ह्यात अटक करता येणार नाही असा स्पष्ट निकाल दिला आहे असे सांगत पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अटक संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून वैभव नाईक यांना अटक केली, तर जिल्हा पोलीस अधीक्षक आणि कुडाळ पोलीस अधिकाऱ्यांवरच गुन्हा दाखल करण्यासाठी कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

या प्रकरणात न्याय मिळावा आणि पोलिसांकडून कायद्याचे पालन व्हावे, या मागणीसाठी आज मराठा समाजाच्या शेकडो बांधवांनी ओरोस येथे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर एकत्र येऊन निवेदन सादर केले. या प्रसंगी मराठा समाजाचे नेते सतीश सावंत, बाबा सावंत, श्रेया परब, सुशांत नाईक, अमरसेन सावंत, कुडाळ तालुका अध्यक्ष संतोष परब, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अनुपसेन सावंत, सोशल मीडिया प्रमुख विनय गायकवाड, युवक अध्यक्ष शैलेश घोगळे, शहराध्यक्ष योगेश काळप यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.

तर आंदोलन उग्र करू

     मराठा महासंघाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेत या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करावी अन्यथा जिल्ह्यात मराठा समाजाच्या वतीने उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे