
सिंधुदुर्गनगरी : ऐन परीक्षांच्या कालावधीत ओरोस बुद्रुक नंबर १ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या बदल्या करून त्यांच्या जागी नव्याने शिक्षक न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करत ओरोस सरपंच उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी आज थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांचे लक्ष वेधले. तसेच या शाळेत शिक्षक देण्याची मागणी केली. दरम्यान या शाळेची पटसंख्या लक्षात घेता या शाळेत तात्काळ पर्यायी शिक्षक उपलब्ध करून द्या आणि जो शिक्षक हजर झाला नाही त्याच्यावर कारवाई प्रस्तावित करा असे आदेश गट शिक्षणाधिकाऱ्यांना यावेळी दिले.
ओरोस बुद्रुक नंबर १ या प्राथमिक शाळेतील ३ शिक्षकांच्या परीक्षेच्या तोंडावर बदल्या करण्यात आल्या आहेत. या शाळेचे मुख्याध्यापक पद ही रिक्त आहे. त्यात ८ पैकी ७ शिक्षक कार्यरत असून त्यातही ३ शिक्षकांच्या बदल्या झाल्याने या शाळेत केवळ ४ शिक्षक राहिले आहेत. या चार शिक्षकांना २३८ विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावे लागत आहे. जास्त पटसंख्या असल्याने एवढ्या कमी शिक्षकांना त्यांना विद्यादानाचे काम करताना अडचण निर्माण होणार असल्याने या शाळेत ज्या शिक्षकांची बदली झाली तेही शिक्षक या शाळेत हजर झाले नसल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने शाळा व्यवस्थापन समितीने याबाबत केंद्र प्रमुख, गटशिक्षणाधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे याकडे लक्ष वेधले होते. मात्र त्यांच्याकडून समर्पक उत्तरे न मिळाल्याने आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने गावचे सरपंच आशा मुरमुरे, उपसरपंच पांडुरंग मालवणकर यांच्यासह पालकांनी आज मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांचे याकडे लक्ष वेधले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नागेश ओरोसकर, पालक आदी उपस्थित होते.
चर्चेवेळी मुख्याध्यापक नाही, शिक्षकांची पदे रिक्त मुलांना शिकवायचे कसे आदी प्रश्न करत शिक्षक मिळत नसतील तर शाळा बंद आंदोलन करू असे पालकांनी सांगितले. यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपण यावर मार्ग काढू असे सांगत या शाळेत तत्काळ पर्यायी शिक्षक उपलब्ध करून द्या आणि जो शिक्षक हजर झाला नाही त्याच्यावर कारवाई प्रस्तावित करा असे आदेश गट शिक्षणाधिकाऱ्यांना यावेळी दिले.
दरम्यान ओरोस बुद्रुक नंबर १ शाळेला कामगिरीवर ३ शिक्षक गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून देण्यात आले. यातील २ शिक्षक आज हजर झाले असून एक उद्या हजर होणार आहे. हे तिन्ही शिक्षक एप्रिल अखेर पर्यंत याच शाळेत ठेवण्याचे आश्वासन गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिले असल्याने उद्याचे शाळा बंद आंदोलन मागे घेण्यात आले असल्याची माहिती शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नागेश ओरोसकर यांनी दिली.