कोकणवासीयांसाठी शरद पवारांची रेल्वे मंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी

Edited by: विनायक गांवस
Published on: October 07, 2025 20:18 PM
views 83  views

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी कोकणवासीयांसाठी विशेष मागणी केली आहे. कुडाळ, कणकवली व सावंतवाडी या स्थानकांवर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची विनंती त्यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे. 

आपल्या पत्रात खा. शरद पवार म्हणालेत की, सिंधुदुर्ग हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा असून, आपल्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांसाठी, ऐतिहासिक किल्ल्यांसाठी आणि समृद्ध कोकणी वारशासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, अनेक लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या सध्या या जिल्ह्यातून न थांबता जात असल्याने येथील नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे निवडक एक्सप्रेस गाड्यांना कुडाळ, कणकवली किंवा सावंतवाडी या स्थानकांवर थांबे देण्यात यावेत असे ते या पत्रात म्हणाले आहेत. 

प्रायोगिक तत्त्वावर पर्यटन हंगामात व प्रमुख सणांच्या काळात जसे की गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी, नववर्ष, होळी आणि उन्हाळी सुट्टी दरम्यान याची अंमलबजावणी करा. यामुळे या भागातील पर्यटनाला चालना मिळेल, विद्यार्थी, व्यावसायिक आणि रुग्ण यांच्या प्रवासात सोय होईल. स्थानिक उत्पादने व हस्तकलेच्या वाहतुकीला प्रोत्साहन मिळेल. तसेच सामान्य जनतेच्या मागणीला योग्य न्याय मिळेल असे ते म्हणाले आहेत.

खालील ३२ गाड्यांचा खा.‌ शरद पवार यांनी उल्लेख केला असून या यादीतील एक्सप्रेस गाड्यांना कुडाळ, कणकवली किंवा सावंतवाडी स्थानकांवर थांबे देण्यात यावे असे ते म्हणाले.