LIVE UPDATES

गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे

रस्ते दुरुस्ती, वाहनतळ आणि नागरी सुविधांना प्राधान्य देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 31, 2026 19:13 PM
views 33  views

सिंधुदुर्गनगरी : आगामी गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी किमान १५ दिवसांचे सूक्ष्म नियोजन करावे असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरंगी सभागृहात आयोजित गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीला पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि उपजिल्हाधिकारी आरती देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीच्या सुरुवातीला उपजिल्हाधिकारी आरती देसाई यांनी सादरीकरणातून विविध विभागांच्या तयारीचा सविस्तर आढावा मांडला.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रत्येक तालुक्यात सर्व यंत्रणांची तातडीने सविस्तर बैठक घेण्याच्या सूचना दिल्या. गणेशोत्सवाच्या काळात आपत्कालीन आणि अत्यावश्यक विभागातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांचे योग्य व्यवस्थापन करावे आणि कोणीही जबाबदाऱ्या सोडून मुख्यालय सोडू नये, असे निर्देश दिले.

सणासुदीच्या काळात बाजारपेठा आणि गावातील मुख्य चौकांमध्ये गर्दी होत असल्याने तात्पुरते वाहनतळ उभारावेत आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांची स्थानिक पातळीवर जनजागृती करावी. विसर्जनाच्या ठिकाणी होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन सुरक्षिततेची काटेकोर खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

कोकणात येणाऱ्या स्थानिकांसाठी रस्ते, वाहतूक व्यवस्था, वाहनतळ, अखंडित वीज, पाणीपुरवठा आणि आरोग्य सुविधा चोख ठेवण्यावर भर देत सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्व खड्डे वेळेत बुजवावेत, पाणीपुरवठा आणि आरोग्य यंत्रणांनी सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी वाहतूक आणि सुरक्षिततेच्या अनुषंगाने सूचना केल्या. बाहेरून येणाऱ्या एसटी बसेस, चारचाकी आणि इतर खासगी वाहनांसाठी योग्य पार्किंग व्यवस्था असावी, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेऊन आपापल्या हद्दीतील वाहनतळांची जबाबदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

प्रवासात ठिकठिकाणी थांबणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था चोख ठेवावी तसेच सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे आवाहन डॉ.दहिकर यांनी केले.