
देवगड (प्रतिनिधी)
"विठ्ठल... विठ्ठल... जय हरी विठ्ठल...!" या अखंड नामघोषाने रविवारी देवगड तालुक्यातील तारामुंबरी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. श्रीक्षेत्र तारामुंबरी येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर देवस्थानाच्या वतीने आणि ह.भ.प. नामदेव महाराज तळवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या तारामुंबरी ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी वारी पालखी सोहळ्याला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. टाळ-मृदंगाच्या निनादात, भगव्या पताकांच्या दिमाखदार लयीत आणि विठ्ठल-रखुमाईच्या अखंड जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. शेकडो वारकरी व भाविकांच्या उपस्थितीमुळे जणू तारामुंबरीतच 'प्रति पंढरपूर' अवतरल्याची अनुभूती प्रत्येकाला येत होती. देवगड तालुक्यासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने या पायी वारीत सहभाग नोंदविला. या वारीचे चालू मानकरी दिनेश कांदळगावकर, सत्यवान हरम, अध्यक्ष सूर्यकांत जोशी, दिंडी अध्यक्ष ह.भ.प. नामदेव महाराज तळवडकर तसेच देविदास परब, मिलिंद कुबल, ज्ञानेश्वर खवळे, शिवाजी कांदळगावकर, बापू जुवाडकर, हेमंत चोपडेकर, संदीप कांदळगावकर, विलास नावगे यांच्यासह महिला भाविकही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.वारीला प्रारंभ होण्यापूर्वी उद्योजक नंदकुमार घाटे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रखुमाईंची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते बाळ खडपे, नगरसेवक विशाल मांजरेकर, शहराध्यक्ष दयानंद पाटील, संजय तारकर, वैभव करगुटकर, विकास कोयंडे तसेच तारामुंबरी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदा या पायी वारीचे दुसरे वर्ष असून, पहिल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी वारकरी आणि भाविकांचा प्रतिसाद अधिक उत्स्फूर्त मिळाला आहे. दरवर्षी वाढणारा सहभाग देवगड तालुक्यातील भक्तीपरंपरा अधिक बळकट करत असून, तारामुंबरीला 'प्रति पंढरपूर'चे स्वरूप प्राप्त होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या पालखीचे मार्गातील विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. या पायी वारीच्या आयोजनासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी मोलाची मदत केल्याचे ग्रामस्थ मिलिंद कुबल यांनी सांगितले......











