LIVE UPDATES

Sindhudurg SIR : जिल्ह्यात एसआयआर मधे ८२,५४९ मतदार मिळेनात

३६,६०६ मयताची नावे वगळणार : मतदार संख्येत होणार घट
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 20, 2026 15:28 PM
views 36  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात राबविलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण मतदार यादीत ६,८८,०१४ मतदारांपैकी तब्बल ८२ हजार ५४९ मतदारांची माहिती आढळून (अनकलेक्टेबल) आलेली नाही. यातील तब्बल ३६ हजार ६०६ मतदार मयत असून यांची नावे वगळली जाणार आहेत तर उर्वरित ४५,९४३ मतदारांना २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ पर्यंत दावे हरकती नोंदविण्याची संधी उपलब्ध आहे. मात्र या कालावधीत त्यांनी हरकती घेऊन योग्य कायदपत्रांची पूर्तता न केल्यास त्यांना मतदार यादीतून वगळले जाणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात मतदार संख्येत घट होणार आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार देशभर विशेष सखोल पुनरिक्षण मतदार यादी २०२६ कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातही हा कार्यक्रम राबविण्यात येत असून १८ जून २०२६ च्या मतदार यादीनुसार जिल्ह्यात ६,८८,०१४ मतदारांचे एसआयआर अंतर्गत मतदारांची माहिती गोळा केली जात आहे. ३० जून ते १७ ऑगस्ट या कालावधीत मतदान केंद्र अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन मतदाराची माहिती आणि प्रशासनाकडून माहितीची छाननी केली आहे. या मोहिमेत ६,०५,४६५ मतदारांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. तर ८२,५४९ मतदारांची माहिती मिळून आली नाही. यात मयत, दुबार आणि स्थलांतरित मतदारांचा समावेश आहे. यामध्ये ३६,६०६ मतदार मयत, ३३,७६२ कायमस्वरूपी स्थलांतरित आणि १३,५८४ मतदारांची माहितीच मिळालेली नाही. ही अनकलेक्टेबल मतदारांची यादी प्रशासनाने ऑनलाइन आणि तालुकास्तरावर प्रसिद्ध केली आहे. 

३६,६०६ मतदार वगळणार!

एसआयआर मोहिमेत तब्बल ३३ हजार ६०६ मतदार मयत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा आकडा एकूण मतदार संख्येतून वगळला जाणार आहे. 

२४ रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर होणार 

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीचे डिजिटायझेशन आणि अनकलेक्टबल यादी प्रसिद्ध करण्यात आली असून प्रारूप मतदार यादी २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

त्यांना हरकत घेण्याची संधी

एसआयआर मोहिमेत जे मतदार अनकलेक्टेबल आढळून आले त्यांना २४ ऑगस्ट २०२६ ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती दाखल करण्याची संधी उपलब्ध असणार आहे. या कालावधीत त्यांनी हरकत घेऊन आवश्यक आणि योग्य ती कागदपत्रे सादर केल्यास त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट केले जाणार आहे मात्र योग्य पुरावा सादर न केल्यास त्यांची नावे वगळली जाणार आहेत.