LIVE UPDATES

जिल्हा बँकेत ७३ गुणवंतांना नियुक्ती, आणखी ६७ पदांची भरती लवकरच

पालकमंत्री नितेश राणे : रोजगाराच्या संधी जिल्ह्यातच निर्माण करणार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 03, 2026 20:40 PM
views 50  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ७३ गुणवंत उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण केले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी नवनियुक्त कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत, "ही केवळ नियुक्तीपत्र वाटपाची औपचारिकता नसून सिंधुदुर्गच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणुकीचा क्षण आहे. गुणवत्तेच्या जोरावर मिळालेली ही नोकरी म्हणजे जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी आहे," असे प्रतिपादन केले. तसेच लवकरच आणखी ६७ पदांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकरी, सहकार क्षेत्र, ग्रामीण अर्थचक्र आणि हजारो कुटुंबांचा आर्थिक प्रवास या बँकेशी जोडलेला आहे. त्यामुळे प्रत्येक नवनियुक्त कर्मचाऱ्याने स्वतःकडे केवळ कर्मचारी म्हणून न पाहता जिल्ह्याच्या विकासाचा भागीदार म्हणून पाहावे. प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि सेवाभाव या मूल्यांच्या आधारे काम करत जिल्हा बँकेची विश्वासार्हता अधिक उंचावावी, असे आवाहन त्यांनी केले.

भरती प्रक्रियेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, पाच वर्षांपूर्वी जिल्हा बँकेची सूत्रे स्वीकारल्यानंतर भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्याचा संकल्प करण्यात आला होता. नोकऱ्या कोणत्याही शिफारशी, दबाव किंवा आर्थिक व्यवहारातून नव्हे, तर केवळ गुणवत्तेच्या आधारे मिळाल्या पाहिजेत, ही भूमिका बँकेने घेतली आणि ती यशस्वीपणे राबवली. या भरतीसाठी शासनमान्य आयबीपीएस (IBPS) या नामांकित संस्थेमार्फत परीक्षा व निवड प्रक्रिया पार पडली असून त्यात कोणताही हस्तक्षेप झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

"आज तुमच्या हातात आलेले नियुक्तीपत्र हे कोणाच्याही शिफारशीमुळे नाही, तर तुमच्या कष्ट, अभ्यास आणि गुणवत्तेमुळे मिळाले आहे. त्यामुळे या विश्वासाचे रूपांतर उत्कृष्ट सेवेत करा," असे सांगत त्यांनी नवनियुक्त कर्मचाऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून दिली. यावेळी त्यांनी रोजगारनिर्मितीबाबत मोठी घोषणा करत, जिल्ह्यातील तरुणांसाठी भरती प्रक्रिया इथेच थांबणार नसल्याचे सांगितले. "आज ७३ जणांना नियुक्ती देण्यात आली असून लवकरच आणखी ६७ पदांची भरती होणार आहे. त्यानंतरही तिसऱ्या टप्प्यात भरती प्रक्रिया राबवून अधिकाधिक स्थानिक युवकांना संधी देण्यात येईल. यावेळी संधी न मिळालेल्या पात्र उमेदवारांनी निराश न होता पुढील भरतीसाठी तयारी ठेवावी," असे आवाहन त्यांनी केले.

सिंधुदुर्गमध्ये उद्योग, सेवा आणि सहकार क्षेत्राचा विस्तार करून स्थानिक तरुणांना जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध करून देण्याचे धोरण शासनाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. "जिल्ह्याच्या भविष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे येथील तरुणाई. त्यांच्या हाताला काम मिळाले तर सिंधुदुर्गचा विकास अधिक वेगाने होईल. जिल्ह्यातील एकही पात्र तरुण रोजगारापासून वंचित राहू नये, हा आमचा प्रयत्न आहे," असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी खासदार नारायण राणे यांच्या योगदानाचाही विशेष उल्लेख केला. "या भरती प्रक्रियेमागे राणे साहेबांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि सिंधुदुर्गच्या विकासाचा दूरदृष्टीचा विचार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पात्र तरुणाच्या हाताला रोजगार मिळावा, हे त्यांचे कायमचे स्वप्न आहे. आज ते कार्यक्रमाला उपस्थित नसले तरी गुणवत्तेच्या आधारे स्थानिक तरुणांना रोजगार मिळताना पाहून त्यांना निश्चितच समाधान वाटले असते," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

कार्यक्रमात जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी बँकेची वाटचाल, पारदर्शक भरती प्रक्रिया, बँकेची आर्थिक प्रगती आणि जिल्ह्यातील बँकिंग सेवांच्या विस्ताराबाबत माहिती दिली. तसेच नवनियुक्त कर्मचाऱ्यांना प्रामाणिक व ग्राहकाभिमुख सेवा देण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला बँकेचे संचालक दिलीप राव राणे, स्मिता राणे, व्हिक्टर डाँटस, ॲड. प्रकाश बोडस, गजानन गावडे, समीर सावंत, रवींद्र मडगावकर यांच्यासह नवनियुक्त कर्मचारी, त्यांचे पालक, बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात नियुक्तीपत्र स्वीकारताना अनेक तरुणांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे भाव पाहायला मिळाले.