
वैभववाडी : तालुक्यातील ऐनारी-साहीलवाडी येथील प्रकाश सखाराम मोहीते (वय ६०) हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असून, याप्रकरणी त्यांचे भाऊ जग्गनाथ मोहीते यांनी वैभववाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश मोहीते हे २८ जुलै रोजी आपल्या चुलत बहिणीकडे तिरवडे येथे राहण्यासाठी गेले होते. तेथे दोन दिवस वास्तव्य केल्यानंतर ३० जुलै रोजी ते तेथून निघाले. मात्र त्यानंतर ते घरी परतले नाहीत. या दिवशी ते घरी परतण्याऐवजी पाचल–कणकवली एसटी बसने कणकवलीत गेलेल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कणकवली बसस्थानक परिसरात गावातील एका व्यक्तीला ते दिसल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यानंतर मात्र त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. अखेर त्यांच्या भावाने, पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद दिली असून, पोलिसांकडून प्रकाश मोहीते यांचा शोध सुरू आहे.










