
सावंतवाडी : तालुक्यातील माजगाव उद्यमनगर येथील एका कंपनीजवळ १८ वर्षीय तरुणाने झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जॉन जोरसेफ टोपो (वय १८, रा. झारखंड) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मृत जॉन टोपो हा माजगाव उद्यम नगर येथील एका कंपनीत कामाला होता. ३० ऑगस्ट रोजी रात्री ११ ते ३१ ऑगस्ट सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास त्याने कंपनीत असलेली नायलॉनची दोरी कापून घेतली. त्यानंतर कंपनीपासून सुमारे १०० मीटर अंतरावर असलेल्या एका जंगली झाडाला त्या दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला.
या घटनेची माहिती त्याचा सहकारी लालबीर राम दयाल खडिया (वय २२, रा. झारखंड, सध्या रा. माजगाव) याने सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शेलार, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक आणि पोलीस नाईक, कोरगावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार श्री. पाटील करत असून दाखल अंमलदार म्हणून पोलीस हवालदार श्री. वालावलकर काम पाहत आहेत. तरुणाने आत्महत्या का केली यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.










